मुंबई - मुंबईच्या डोंगरी परिसरात राज्य राखीव दलाच्या जवानाने आज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या ( SRPF Jawan Suicide ) केली. पुष्कर शिंदे असे या जवानाचे नाव आहे. त्याने SLR रायफलने स्वतःला मानेखाली गोळी मारून घेतली. त्याने हे कृत्य का केले याबाबत अद्यापही काही उलगडा झालेला नाही. शिंदे हे मंत्रालयाच्या मुख्य गेटवर एसआरपीएफ गट क्रमांक 2 मध्ये तैनात होते.
मानेवरच गोळी झाडून घेतली
मुंबईत एका एसआरपीएफ जवानाने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला रूग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्याठिकाणी मृत घोषित करण्यात आले. दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात हा प्रकार घडला. शिंदे हा एसआरपीएफच्या पुण्यातील ग्रुप 2 चा जवान आहे. त्याला 6 जानेवारीपासून मंत्रालयात मुख्य गेटवर नियुक्ती देण्यात आली होती. तो आज आपली ड्युटी संपवून महापालिका शाळेत आला. सध्या त्याच्या राहण्याची सोय तेथेच करण्यात आली आहे. शाळेच्या खोलीत तो एकटाच असताना त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. मानेवरच गोळी झाडून घेतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.