मुंबई : सीरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारकडे सुरक्षेची कसलिही मागणी केलेली नसताना केंद्र सरकार त्यांना सुरक्षा पुरवत आहे. सध्या ते देशात नसतानाही ही सुरक्षा यंत्रणा त्यांच्या घराबाहेर आणि सीरमबाहेर पाहायला मिळते. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा दिली आहे की त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. तसेच अदर पूनावाला यांना शिरच्छेद करण्याची धमकी कुणी दिली याचा खुलासा त्यांनी करावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस पूनावालांना संरक्षण देईल
सीरमचे सीईओ अदर पूनावाला हे सध्या देशात नसून ब्रिटनमध्ये आहेत. या देशातून त्यांनी एका खाजगी वृत्तसंस्थेला मुलाखत देत असताना गंभीर आरोप केले होते. सीरम संस्था कोव्हिशील्ड लसीचे उत्पादन करत असून, या लसीसाठी सध्या माझ्यावर प्रचंड दबाव टाकला जातोय. हा दबाव देशातील मोठे नेते आणि मोठे उद्योगपती टाकत असल्याचा आरोप अदर पूनावाला यांनी केला होता. त्यांची नावे जर मी सांगितली तर माझा शिरच्छेद होईल अशी भीती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. मात्र अदर पूनावाला यांनी देशात घाबरण्याची गरज नाही. काँग्रेस त्यांच्या सुरक्षेसाठी तयार असून त्यांना कोणतीही इजा होऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
नाना पटोलेंची पूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सुरक्षेच्या आडून पूनावालांची हेरगिरी
नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अदर पूनावाला यांना दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेतून त्यांची हेरगिरी केली जात असल्याचा आरोपही केला आहे. अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारकडे सुरक्षेची मागणी न करता केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा का दिली? याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केली.
रेमडेसिवीरच्या काळ्या बाजारासाठी केंद्र जबाबदार
रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात केंद्र सरकारने थांबवली आहे. मात्र अजूनही रेमडेसिवीर खुल्या बाजारात केंद्र सरकार उपलब्ध करून देऊ शकलेली नाही. त्यामुळे आज देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. त्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. तसेच रेमडेसिवीर आणि लसीसंदर्भात केंद्र सरकारचं योग्य नियोजन नसल्यामुळे, सध्या देशात तुटवडा निर्माण झाल्याची टीका पटोले यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडेही बघावे
भारतीय जनता पक्ष हा खूप सुसंस्कृत पक्ष आहे. त्यामुळे भुजबळांवर आरोप करताना त्यांनी आपल्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडे देखील बघावं असा टोला नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. काल प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ हे जामीनावर बाहेर असून त्यांनी जास्त बोलू नये असा इशारा दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देत असताना नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय.