मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे प्रचारासाठी सत्ताधाऱयांसह विरोधकांनीही केंद्रातले दिग्गज नेते मैदानात उतरवले आहेत. या निवडणुकीत असे काही उमेदवार रिंगणात आहेत ज्यांचे वडील सक्रिय राजकारणात आहेत. यात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे तसेच मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे या दिग्गजांचा यात समावेश आहे. त्यामुळे सध्याच्या प्रचारात या उमेदवारांच्या अर्धात स्वत:च्या मुलांसाठी त्यांचा 'बाप' मैदानात उतरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - राज्यातील कुस्ती संघटनेचा अध्यक्ष मीच आहे; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
आई व मुलांची माया आपण कायमच कवितांमधून किंवा काही प्रसंगावरुन अधोरेखीत झालेली पहायला मिळते. दुसरीकडे 'बाप' हा कायमच पडद्यामागून आपली जबाबदारी निभावत असतो. तो सर्वसामान्यांच्या घरात असो किंवा राजकारण्यांच्या घरात. सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. अनेक पक्षांनी राजकारणात असलेल्यांच्या मुलांना तिकीट दिले आहे. त्यामुळे तो 'बाप' जिवाचे रान करून आपल्या मुलांना निवडणुकीत जिंकण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहे.
हेही वाचा - 'आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, मलाही जशास-तसे उत्तर देता येते'
उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे आखाड्यात उतरले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या काळात उद्धव ठाकरे हे वरळीत मुलासाठी प्रचारसभा घेणार आहेत. कोकणात राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील सुनील तटकरे हे मतदारसंघात बैठका, प्रचारसभा घेत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या देखील सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे हे पायाला भिंगरी लावल्यासारखे मुलीच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रचारसभा तसेच रॅली काढत मुलीला जिंकवण्यासाठी दिवस रात्र एक करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीत 9 हजार 673 केंद्रातील मतदानाचे होणार लाइव्ह वेबकास्ट
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथे रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ते प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भोकरदनमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठीही स्वत:हा एकनाथ खडसे मैदानात उतरून प्रचार करत आहेत. नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. तिथे नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेने राणेंविरोधात उमेदवार दिल्याने राणे यांचे येथे वर्चस्व टिकवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. नारायण राणेदेखील जोरदार प्रचार करताना दिसत आहेत.
दरम्यान, हा प्रचारासाठीचा शेवटचा आठवडा असून सर्वच पक्षांकडून केंद्रातले नेते प्रचारासाठी राज्यात दाखल झाले आहेत. 21 ऑक्टोबरला मतदान तर, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून दिवाळीआधीच कोणाचे फटाके फुटणार हे समजणार आहे.