मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून ई-चलान पाठवून दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र, हा दंड वाहन चालक भरत नसल्याने वाहतूक विभागाची डोकेदुखी वाढली होती. यावर आता मार्ग काढण्यासाठी राज्यात एक हजारांहून अधिक रक्कमेचे ई-चलान थकवलेल्या 5 लाखांहून अधिक वाहन चालकांना प्रशासनाने लोक अदालतमार्फत नोटीस बजावली आहे. परिणामी, न्यायालयीन कार्यवाहीच्या भीतीपोटी गेल्या सहा दिवसांत तब्बल २ लाख १४ हजार ९८५ वाहन चालकांनी दंड भरला असून दंडाची रक्कम १० कोटी ३३ लाख ९४ हजार इतकी आहे. याउलट ज्या वाहन धारकांनी ई-चलान अद्यापही भरले नाही, त्या वाहन चालकांना लोक अदालतमध्ये हजेरी लावावी लागणार आहे.
दंड वसुलीसाठी न्यायालयाची मदत
राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालक व मालकांची वाहने न अडवता वाहतूक पोलीस, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून वाहन चालकाच्या गाडीच्या क्रमांकाचे छायाचित्र काढतात, त्यानंतर वाहन चालकाला ई-चलान दंडाची माहिती वाहन मालकालाच्या मोबाइलवर संदेशद्वारे पाठविला जातो. हा दंड वाहन चालकांना पोलिसांच्या संकेतस्थळावर तसेच पोलिसांकडे डेबिट कार्डद्वारे भरता येतो. मात्र, अनेकदा वाहन चालकही दंडाची रक्कम भरत नाहीत. त्याचा परिणाम सरकारच्या महसुलावर होत आहे. त्यामुळे थकीत असलेल्या दंड वसूल करण्यासाठी गेल्या काही वर्षात चालकांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित करणे किंवा त्यांना फोन करून सूचना देणे इतकेच नव्हे तर घरी पोलीससुद्धा पाठविणे अशा अनेक शकली वाहतूक विभागाने लढविल्या. मात्र त्यात वाहतूक विभागाला यश आले नाही. अखेर थकीत दंड वसुलीसाठी प्रशासनाने न्यायालयाची मदत घेतली आहे. त्यानुसार, एक हजारांहून अधिक रक्कमेचे ई-चलान थकवलेल्या 5 लाखांहून अधिक वाहन चालकांना प्रशासनाने लोक अदालतमार्फत नोटीस बजावली आहे.
भीतीपोटी १० कोटींहून थकीत दंडाची वसुली
वाहतूक विभागाच्या या मोहिमेत आता दंड थकवणाऱ्या चालकांना थेट लोक अदालतमार्फत न्यायालयात हजर राहण्याच्या नोटीस बजावण्यात येत आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात मुंबई शहरासह ठाणे शहर व ग्रामीण, नवी मुंबई, पालघर, मीरा-भाईंदर, पुणे शहर व ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर व ग्रामीण या विभागांमध्ये दंड थकवलेल्या चालकांना नोटीस बजावल्याची माहिती आहे. या विभागांमध्ये पाच लाखांहून अधिक वाहनांवर 18 लाखांहून अधिक ई-चलान बजावण्यात आले आहेत. या ई-चलानच्या थकीत दंडाची रक्कम तब्बल 80 कोटी रुपयांहून अधिक आहे. न्यायालयीन कार्यवाहीच्या भीतीपोटी गेल्या सहा दिवसांत तब्बल २ लाख १४ हजार ९८५ वाहन चालकांनी दंड भरला असून दंडाची रक्कम १० कोटी ३३ लाख ९४ हजार इतकी आहे.
संपूर्ण राज्यात राबविणार प्रयोग
गेल्या सहा दिवसांतील प्रतिसाद पाहता आता हा प्रयोग संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. परिणामी, राज्यभरात ज्या वाहन चालक व मालकांनी त्यांच्या वाहनांवर आकारण्यात आलेली ई-चलानची दंडाची रक्कम भरलेली नाही, त्यांना लवकरच न्यायालय नोटीस बजावणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागातील एका बड्या अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे ज्या वाहन धारकांनी ई-चलान भरले नाही. त्यांनी लवकरात लवकर ई-चलानचा दंड भरावा अन्यथा त्यांना न्यायालयाचे खेटे घालावे लागणार आहेत.
१ हजार १८४ कोटी रुपयांचा दंड
गेल्या दोन वर्षात वाहतूक पोलिसांनी राज्यभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना ई-चलान पाठविण्यात आले आहे. या ई-चलानच्या दंडाची रक्कम एकूण १ हजार १८४ कोटी ६५ लाख ७४ हजार ५४० रुपये आहेत. यातून ३४९ कोटी ४२ लाख २१ हजार ६२१ रुपये दंड वाहन चालकांनी भरलेला आहेत. या उलट ८३५ कोटी २३ लाख ५२ हजार ९१९ रुपये दंड थकीत आहेत. त्यामुळे हा दंड वसूल करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक वाहतूक आणि परिवहन विभागाकडून बैठकीचे सत्र सुरू आहे. लवकरच यावर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.