मुंबई - राज्यात उन्हाळी सुट्टयांनतर विदर्भाचा अपवाद वगळता १५ जूनला शाळा सुरू होतात. त्यासाठीचे वार्षिक वेळापत्रक आणि नियोजनही केले जाते. परंतु कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील शाळांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. मुंबईसह राज्यात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, शाळा कधी सुरू होतील, यावर सरकारचीही भूमिका स्पष्ट होताना दिसत नाही. यामुळे शिक्षकांपासून ते पालकांमध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी कोणकोणते नियोजन आणि बदल करणे आवश्यक आहेत, यासाठी शिक्षकांसोबतच शिक्षण विभागातील काही तज्ज्ञांनी 'ईटीव्ही भारत'कडे आपली मते नोंदवली आहेत.
शालेय शिक्षण विभागात मागील चाळीस वर्षांमध्ये अध्ययन आणि त्यासाठीच्या विकसित पद्धतींवर काम करणारे माजी शिक्षण उपसंचालक राम पवार म्हणतात, की शाळा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू झाल्या नाहीत, तर त्याचे अनेक परिणाम होणार आहेत. मात्र त्यावर पर्यायही आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रातील शाळांना शनिवारी असलेली अर्ध्या दिवसांची सुट्टी टाळून अनेक तास वाचवता येतील. दिवाळीच्या सुट्टीतील वेळेचा वापर करता येईल. त्यासोबतच सध्या सगळीकडेच ऑनलाईन आणि होम फॉर स्टडीचाही मोठा गाजावाजा होत आहे. सॅटेलाईट आणि उपग्रह वाहिन्याही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अध्यापन पूरक साधने म्हणूनच याकडे पाहिले पाहिजे. शिक्षकांची उणीव भरून काढता येत नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे माहिती मिळेल, परंतु ज्ञान मिळेलच असे नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
शाळांच्या वेळापत्रकावर मुख्याध्यापक संघटनेचे सचिव व मुख्याध्यापक प्रशांत रेडीज यांनी तर जोपर्यंत कोवीडची लस येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करू नये, असे मत व्यक्त केले. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळांची स्थिती लक्षात घेता प्रत्येक वर्गात ३० ते ६० हून अधिक विद्यार्थी बसवलेले असतात. त्यांचे सोशल डिस्टसिंग कसे करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शाळा पुढे काही महिन्यांनी सुरू झाल्या, तरी शिक्षक, मुख्याध्यापक त्यासाठीचे नियोजन करतील. मात्र हे संकट दूर होईपर्यंत शिक्षण व्यवस्थेतच बदल करण्यासाठी पॅकेज अथवा त्याचे वेगळे नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली. ऑनलाईन शिक्षणावर रेडीज म्हणाले, की मुंबईसारख्या शहरांमध्येही अनेक पालकांकडे तसे मोबाईल आणि यंत्रणा नसते. त्यातच अनेकांची रिचार्ज करण्याची ऐपत नसते. त्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार कोणी करत नाही, असेही ते म्हणाले. यादरम्यान बाल हक्कांचा विषय समोर येऊ शकतो, त्यामुळे लस येण्यापूर्वी जर शाळा सुरू केल्या, तर अनेक शहरांमध्ये अणुस्फोटासारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीतीही रेडीज यांनी व्यक्त केली.
मुंबईतील मराठी शाळेतील सहायक शिक्षिका वैशाली नाडकर्णी म्हणतात, शाळा उशिरा सुरू झाल्या, तरी त्यासाठीचे नियोजन करणे शक्य आहे. नियोजित सत्रांमधील काही पार्ट वगळले, काही ऑनलाईन आणि काही कृती अभ्यासक्रमावर भर देऊन यातून मार्ग काढता येतील, असेही त्या म्हणाल्या. पहिल्या सत्राला उशिर झाला तरी दुसऱ्या सत्रात सुट्टया आणि वेळेचे नियोजन करणे शक्य आहे. विद्यार्थ्यांचे कुठेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी शिक्षक घेतील असेही त्या म्हणाल्या.