मुंबई - मागील 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यावर अनंतचतुर्थीला गणेशाला निरोप देण्यात येतोय. राज्यभरात सर्वत्र कोरोनाच्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा होतोय. महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र खरबदारी घेण्यात येत आहे. मुंबईतील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात मंडळं, मिरवणुकांसाठी गर्दी हे चित्र अनंतचतुर्दशीला पाहायला मिळते. मात्र यावेळी सर्वत्र शांततेत विसर्जन पार पडत आहे.
दरवर्षी समुद्र किनाऱ्यांवर विसर्जनासाठी गर्दी होते. मात्र यंदा हे किनारे सामसूम आहेत. जुहू किनाऱ्यावर देखील यंदा गर्दी नाहीय. समुद्राला भरती असल्याने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नेमलेले स्वयंसेवक गणेशमूर्तींचे विसर्जन करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने इथे लाईफगार्ड, पोलीस, अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे.
दरवर्षी जुहू समुद्रकिनारी सकाळपासून होणारी गर्दी यावेळी दिसून आली नाही. पालिकेने अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव बांधल्याने व यंदा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची उंचीही कमी झाल्याने अनेकांनी जुहू समुद्रकिनाऱ्या ऐवजी कृत्रिम तलावाकडे विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल आहे.