मुंबई - नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) करण्याचा इशारा दिल्यानंतर आक्रमक शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घरावर हल्ला केला. याप्रकरणात राणा दाम्पत्याला धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यामुळे भाजपा नेते किरीट सोमैया हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले. यावेळी शिवसैनिकांनी सोमैया यांच्या गाडीवर दगडफेक ( Kirit Somaiya Attack Case ) करत हल्ला केला. या हल्ल्यात किरीट सोमैया यांच्या गाडीच्या काचा फुटून त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र राज ठाकरेंनी सुरू केलेल्या भोंग्याच्या प्रकरणात राणा दाम्पत्यापासून किरीट सोमैयांच्या एन्ट्रीपर्यंत हे प्रकरण अधिकाधिक गंभीर बनत चालले आहे, त्याचाच घेतलेला हा आढावा.
कसा सुरू झाला वाद . . . - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे काढण्यात यावे, अन्यथा 3 मे पासून मशीदीसमोर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) सुरू करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राजकारण करायचे असल्याची टीका राजकीय नेत्यांनी सुरू केली. संजय राऊत, शरद पवार यांनीही याप्रकरणी राज ठाकरेंच्या या भूमीकेवर जहरी टीका केली.
महाविकास आघाडी, मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी 16 एप्रिलला या वादात उडी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदावर आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली ( Ravi Rana Criticized CM Thackeray ) आहे. महाराष्ट्राची ही साडेसाती दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी 'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) करावे, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी राणांच्या घरी हनुमान चालीसा पठण केले. यावर राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री' बाहेर आपण 23 तारखेला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जात असल्याची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटले. राणा दाम्पत्याला अमरावतीतच अडवण्याचा प्रयत्न होणार होता, त्यामुळे त्यांनी गनिमीकावा करत एक दिवस आधीच मुंबई गाठली, 23 एप्रिलला शिवसैनिकांनी राणांच्या मुंबईतील घरावर हल्ला केला.
शिवसैनिकांनी का केला किरीट सोमैयांवर हल्ला - मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक करुन खार पोलीस ठाण्यात नेले. यावेळी किरीट सोमैयांनी माध्यमांशी बोलताना आपण रात्री 10 वाजता खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याच्या भेटीला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्याने मुंबईत 'मातोश्री'बाहेर जमा झालेले शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले. त्यातच नागपुरात राणा प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेविरोधात चाल करुन येणाऱ्यांना 20 फूट खोल गाडून टाकण्याची वल्गना केली.
शिवसेना नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना किरीट सोमैया रात्री खार पोलीस ठाण्यात पोहोचले. झेड प्लस सुरक्षा असल्याने किरीट सोमैया यांच्यावर शिवसैनिक चाल करणार नाहीत अशी सगळ्यांची धारणा होती. मात्र दबा धरुन बसलेल्या सैनिकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात घुसून किरीट सोमैयांवर हल्ला केला. या हल्ल्यात किरीट सोमैया यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. किरीट सोमैया यांनाही किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे संतापलेल्या सोमैया यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे येईपर्यंत गाडीच्या खाली उतरणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर भाजप नेत्यांच्या आग्रहाने सोमैया यांनी शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे सोमैया यांच्या कार चालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरीट सोमैयांनी का केली दिल्लीवारी - खार पोलीस ठाण्यात किरीट सोमैया गेल्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. मात्र तरीही पोलिसांच्या समोर शिवसैनिक पोलीस ठाण्याच्या परिसरात घुसले. मुंबई पोलिसांच्या संमतीने शिवसैनिक पोलीस ठाण्याच्या परिसरात घुसल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला. त्यामुळे शिवसैनिकांनी आपल्याला तीन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न करुनही पोलीस कारवाई करत नाहीत. पोलिसांच्या आडून शिवसैनिकांची गुंडगिरी सुरू असल्याचा किरीट सोमैया यांचा आरोप आहे. त्यामुळे केंद्राने या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी यासाठी सोमैया दिलीत गेले आहेत. केंद्राने पथक पाठवून याबाबत कारवाई करण्याची मागणी सोमैयांनी केंद्रीय गृहसचिवांकडे केली आहे.