मुंबई - नऊ ऑगस्ट १९४२मध्ये 'चले जाव' आंदोलनाचा पाया रचला गेला, यामुळे इतिहासात हा दिवस क्रांती दिवस म्हणून समजला जातो. याच दिवशी महात्मा गांधींनी अन्य नेत्यांना एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्य समरात सामील होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, या दिवसाच्या एक दिवसआधी ८ ऑगस्टला अखिल भारतील काँग्रस समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत 'भारत छोडो'चा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
गांधीजींनी मुंबईत 'चले जाव'चा नारा दिला आणि देशात एक क्रांतीकारी आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात देशातील सर्व जाती, पंथ, धर्म, वर्गातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. हे आंदोलन पुढे देशभरातील सामाजिक बदलाची चळवळ ठरली. या विषयी सांगत आहेत, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे.
प्रश्न : गांधीजींनी दिलेल्या 'चले जाव'च्या नाऱ्याविषयी काय सांगाल?
उत्तर : 'चले जाव'चा नारा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याची शेवटची लढाई. त्यावेळी महात्मा गांधींनी 'करेंगे या मरेंगे' असा नारा दिला होता. सोबतच गांधीजींचं अभूतपूर्व असं भाषण झालं होतं. समोरच्या माणसाला चटकन कळेल असा अतिशय चांगला शब्दात त्यांनी संदेश दिला. ते म्हणाले, ' तुम्ही उद्यापासून स्वतंत्र आहात, असं वागायला आता सुरुवात करा. इथून गेल्यावर तुम्ही स्वतंत्र नागरिक आहात, तुम्ही कोणाचे गुलाम नाही, असे तुम्ही वागा' गांधींचा हा संदेश भारतीय मनाला बरोबर कळला आणि त्याच्यानंतर प्रचंड मोठा उठाव झाला. 1942पर्यंत गांधीजींची लढाई ही अहिंसक लढाई होती. या आंदोलनामध्ये आणि 1942च्या क्रांती पर्वामध्ये अनेक पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन, पोलीस चौक्या ताब्यात घेण्यात आल्या. सरकारची प्रतीक ताब्यात घेतली गेली आणि त्यांच्यावर शासन केलं गेलं. हे स्वातंत्र्याच्या दृष्टीने जनतेनं उचललेलं पाऊल होतं.
प्रश्न : याच दरम्यान देशामध्ये पत्री सरकारसुद्धा होते. यामाध्यमातून देखील अनेक लोकहिताचे निर्णय घेतले होते, ते निर्णय काय होते?
उत्तर : पत्री सरकारांनी ब्रिटिशांना घालवून ते शांत बसले नाहीत. हे पत्री सरकारांचे वैशिष्ट्य होते. पत्री सरकारांनी गावगुंड आणि काळा बाजाराचा व्यापार करणाऱ्यांना जबर शिक्षा ठोठावल्या होत्या. दुसरीकडे अस्पृश्यता निवारण आणि एक गाव एक पाणवठा किंवा लग्नांवर अफाट खर्च करू नये. लग्न स्वस्तात करावी. रस्ते, शिक्षा, साक्षरता वर्ग, आरोग्याच्या सुधारणा, ग्रामसफाई अशा अनेक कल्याणकारी कार्यक्रम या पत्री सरकारने राबवली. त्यामुळे त्यांना जनतेतून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता.
प्रश्न : महात्मा गांधी यांच्या चळवळीचे पडसाद अनेक लोककल्याणकारी चळवळीत झाले होते, असे आपल्याला वाटते काय?
उत्तर : महात्मा गांधींनी केवळ नारा दिला होता 'करेंगे या मरेंगे' परंतु गांधींनी 1915 पासूनच भारतीय समाजाला ती शिकवण दिलेली आहे. त्याचं रूपांतर प्रत्येकाने आपल्याला हवं तसं करून घेतलेले आहे. त्यामुळे पत्री सरकारही ब्रिटिशांशी लढून तयार झाली, तरीही गांधी विचारात आपण काय काम करायला हवे, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे नऊ ऑगस्टला जरी क्रांती पर्वाला सुरुवात झाली असली, तरी वर्षभरामध्ये देशामध्ये गोळीबारात दहा हजाराहून जास्त माणसं मारली गेली होती. पण फार मोजके ब्रिटिश सैनिक यामध्ये मृत्युमुखी पडले होते. ज्या नेत्यांनी ब्रिटिशांवर हल्ले केले अशी काही तुरळक उदाहरणं होती. ती सोडली तर जनतेने कुठेही सामुहीक हल्ले केले नाहीत. हेच गांधींजींच्या शिकवणीचं आपल्याला मिळालेलं मूल्य आहे.
प्रश्न : महात्मा गांधींची ही शिकवण आणि त्याचे आजच्या दृष्टिकोनातून मूल्यमापन कसे करावे?
उत्तर : स्वातंत्र्य चळवळ आणि या चळवळीचे मूल्यमापन असे आहे की, या चळवळीत काही संघटनांचा सहभाग नव्हता. त्या संघटना कोणत्या ते सर्वांनाच माहीत आहे. पण कामगार, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर हे सगळे माणसं आपल्यातील भेद विसरून खऱ्या अर्थाने आपण भारतीय आहोत, अशी शुद्ध भावना ठेवून ते लढाईत उभे राहिले होते. त्यावेळच्या काही कार्यकर्त्यांचं मनोगत पाहिलं, तर त्यातून आम्ही भारतीय आहोत हे या आंदोलनाने आम्हाला कळलं, असं त्या वेळच्या तरुणांनी सांगितलेलंय. त्यावेळी हिंदू - मुसलमान, ख्रिश्चन, पारसी, दलित, दलित-सवर्ण असे जातिभेद नव्हते. हे सर्वजण केवळ देशासाठी गांधीनी हाक दिली म्हणून जात होते. मुख्य संदेश हाच की, आजही भारताला हीच गरज आहे. आपण सगळे एक होऊन आपल्यातील विविधता जी आहे, ती टिकवून आपण वेगळे कसे आहोत, आपापले रंग वेगळे ठेवून ही आपण सप्तरंगी इंद्रधनुष्य कसं होऊ शकतो, हेच या चळवळीमधून शिकण्यासारखे आहे.