मुंबई - मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू देखील झाला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये भारतीय रेल्वे महाराष्ट्राच्या मदतीला धावून आली. रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन राज्यात आणला गेला. विशेष म्हणजे ही ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याची जबाबदारी ज्या लोको पायलटवर सोपवण्यात आली होती, त्यात मराठी तरुणांचा समावेश आहे.
नुकतेच गुजरातमधील हापा येथून ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून तीन टँकरद्वारे 44 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन कळबोली येथे आणण्यात आले. 860 किमीचा आव्हानात्मक प्रवास होता. विशेष म्हणजे वसई रोड ते कळबोली हे 60 किलोमीटर अंतर सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. कारण एक्सप्रेसचा वेग, ओव्हर ब्रिज, बोगदे, प्लॅटफॉर्म कॅनोपीज, या सारख्या अनेक अडचणी होत्या. या सर्वांचा अभ्यास करून रेल्वे प्रशासनाने वसई रोड मार्ग निवडला होता. या मार्गावर ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याची जबाबदारी लोको पायलेट गुड्स प्रवीण कुमार बरमैया आणि सहाय्यक लोको पायलेट मंगेश म्हसणे या दोघांवर सोपविण्यात आली होती. रेल्वेच्या या दोन्ही तरुण लोको पायलटनी वेळेत आणि मोठ्या कुशलतेने अवघ्या 1 तास 19 मिनिटांत रेल्वे वसई रोडवरून कळंबोली यार्डात आणली.
'ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवायची संधी भेटल्याने अभिमान वाटतो'
ईटीव्ही भारतला बोलताना, लोको पायलेट प्रवीण कुमार बरमैया यांनी सांगितले की, गेले 11 वर्ष मी लोको पायलट म्हणून काम करतो आहे. मात्र, या कोरोना संकट काळात मला रेल्वेकडून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यासाठी संधी मिळाली, त्यामुळे मला स्वतःवर गर्व होत आहे. त्यासाठी मी मध्य रेल्वेचे आभार मानतो. जेव्हा आम्ही ऑक्सिजन एक्स्प्रेसचा चार्ज वसई रोडवरून घेतला. तेव्हा आमच्या पुढे एकच आव्हान होते की, ठरावीक गतीने गाडी चालवायची होती. त्याचबरोबर ही ऑक्सिजन एक्स्प्रेस लवकरात लवकर कळंबोली यार्डात कशी पोहोचवता येईल, याबाबत सुद्धा आम्ही विचार करत होतो. मात्र रेल्वेने विभागाने या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडॉर दिल्यामुळे आम्हाला वेळेवर गाडी ठरलेल्या ठिकाणी पोहोचवता आली.
'युद्धपातळीवर काम करण्याचा अनुभव'
सहाय्यक लोको पायलट मंगेश म्हसणे यांनी ईटीव्हीला सांगितले की, गेल्या एका वर्षापासून कोविड काळात जीवनावश्यक वस्तूचा तुकडा पडू नयेत म्हणून आम्ही सर्व काम करतो आहे. मात्र माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच युद्धपातळीवर काम करण्याचा मला अनुभव मिळाला. ऑक्सिजन एक्स्प्रेस येणार हे माहीत होतं. तीन तास अगोदरच आमची तयारी पूर्ण झाली होती. ऑक्सीजन एक्स्प्रेस वसई रोडला येताच आम्ही चार्ज घेऊन अवघ्या तीन मिनिटात गाडी सुरू केली. एक तास 19 मिनिटांन ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीला पोहोचली. विशेष म्हणजे मी महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे. या संकटकाळात मलाही ऑक्सिजन एक्स्प्रेस घेऊन जाण्याची संधी मिळाली त्यामुळे अभिमान वाटत आहे.
होही वाचा - काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..