मुंबई - विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर त्याचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही उमटले. आज आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर तालिका अध्यक्षांनी आमदार रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले.
रवी राणा हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना निवेदन देण्याकरिता हौदेत उतरले होते. 'अशा प्रकारे निवेदन देता येत नाही, तुम्हाला योग्य वेळी बोलण्याची संधी दिली जाईल', असे तालिका अध्यक्षांनी राणांना ठणकावून सांगितले. मात्र, तरीही राणांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालिका अध्यक्षांनी आमदार रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शलला दिले.
राजदंडाचे महत्त्व काय? -
अध्यक्षांच्या आसनासमोर राजदंड ठेवला जातो. सभागृह संपेपर्यंत राजदंड तिथेच ठेवतात. राजदंड हा सभागृहातील सर्वोच्च सन्मानाचे प्रतिक असतो. तो उचलून सभागृहाबाहेर नेल्यास सभागृहाचे कामकाज थांबवावे लागते.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेला- फडणवीस