मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सायन उड्डाणपुलाचे सांधे बदलण्याचे काम हाती घेतल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण एमएसआरडीसीने सांधे बदलण्याच्या कामासाठी प्रत्येक शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ या वेळेत शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपनगराकडून सकाळी मुंबईकडे येणाऱ्या सायंकाळी मुंबईतून उपनगराकडे जाणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना करावा लागणार आहे.
एमएसआरडीसीचा तीन महिन्यांसाठी निर्णय -
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सायन उड्डाणपुलाचे सांधे बदलण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यास सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे काही मार्गांत वाहतूक पोलिसांनी बदल केले आहेत. आजपासून प्रत्येक शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ या कालावधीत शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल. ९ जानेवारी २०२२ पर्यंत अशाचप्रकारे दर विकेन्डला उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येईल. मुंबईकरांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शीव सर्कल येथे खासगी ट्रॅव्हल्स बसेसना प्रवेश बंदी व वाहन थांबविण्यास निर्बंध घातले आहेत. याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील अरोरा जंक्शन ते हायवे अपार्टमेंट दरम्यानच्या दोन्ही मार्गिंकावर खासही बसेसना बंदी असेल. याउलट दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या खासगी प्रवासी बसेसना अरोरा जंक्शन येथून उजवे वळण घेवून पुढे वडाळा ब्रिजवरून बरकत अली नाकामार्गे वडाळा वाहतुक विभागाच्या हद्दीतून बीपीटी रोडमार्गे वडाळा टी.टी. रोडवरून ठाणे किंवा पनवेलच्या दिशेने जाण्यास मुभा असेल, अशी माहिती वाहतूक विभागाचे मध्य मुंबईचे पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन यांनी दिली.
हे ही वाचा - Cruise Drug Case : एनसीबी कारवाईतील पंच फ्लेचर पटेल हा समीर वानखेडेंचा मित्र; नवाब मलिकांचा खुलासा
..या मार्गांवर विकेन्डला पार्किंग व गाडी थांबवण्यास बंदी-
मध्य व दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर प्रत्येक विकेन्डला वाहने पार्क व थांबविण्यास बंदी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव रुग्णालयाने हायवे अपार्टमेंट पर्यंतचा परिसरात दोन्ही दिशेला गाड्यांची पार्किंग व गाडी थांबवण्यास बंदी असणार आहे. शीव रेल्वे स्थानक मार्गावरील देशपांडे चौक ते भावना बार आणि रेस्टॉरंट या दरम्यानचा परिसरातील दोन्ही मार्गावर विकेन्डला नो पार्किंग असेल. रोड क्रमांक ८ वरील शीव सर्कलने रोड क्रमांक २० दरम्यानच्या दोन्ही मार्गांवर नो पार्किंग असेल. आर. एस. केळकर मार्गावरील शीव सर्कलने स्वामी वल्लभदास मार्गावरील दोन्ही मार्गिंकावर नो पार्किंग असेल. शीव रेल्वे स्थानक रोडवरील जंक्शनहून देशपांडे चौक दरम्यानचा परिसरात वाहने थांबवण्यास मनाई आहे.