मुंबई: गेल्या ७३ दिवसांपासून संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नाहीत. हे पाहता एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. आता कामावर न आलेल्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने नोटीस पाठवून कारवाई का करू नये? असे विचारले आहे. यामध्ये सेवा समाप्ती करण्यात आलेले कर्मचारी वगळून जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजवली आहे. या नोटीसला जबाब देणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वगळून मुदतीनंतर सरसकट कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची कायदशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. तसेच नोटीसला कायदेशीर उत्तर देणा-या कमर्चाऱ्यांकडून समाधान कारक उत्तरे नसतील तर त्यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नोकर भरतीसाठी काढली जाहिरात
अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने निवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांच्या नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने जाहिरात दिली आहे. तसेच खासगी कंपन्याकडून कंत्राटी चालक मागविण्यासाठी देखील जाहिरात काढली आहे. निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांच्या नोकरी करता येणार आहे, जाहिरातीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वय ६२ वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान ०६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक पाहिजे. सेवाकाळात अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघात नसणे, तसेच कर्मचारी हा शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त केलेला नसावा. चालकपदी ठोस मेहनतान्यावर कामगिरी करण्यासाठी चालकाकडे अवजड वाहन चालन परवाना वैध असणे तसेच पी.एस. व्ही. बिल्ला असणे हो आवश्यक आहे. इच्छुक चालक ते ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले त्या विभागांमध्ये करारपद्धतीवर अर्ज करू शकतील. रा.प. महामंडळास गरज भासल्यास नजीकच्या विभागात नियुक्ती करण्यात येईल.
बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ९२५ वर
एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरुच ठेवली आहे. महामंडळाने आतापर्यत ११ हजार ०२४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यत २ हजार ६११ कर्मचाऱ्यांना काेरणे दाखवा नाेटीस महामंडळाकडून बजावली आहे. तर साेमवारी महामंडळाने ११० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ९२५ वर पोहचली आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या मािहतीनुसार, राज्यभरातील २५० आगारांपैकी १७० आगार सुरु झाली असून अजूनही ८० आगार संपामुळे अजूनही बंद असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.