मुंबई - महाराष्ट्र पोलीस दलातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. सध्याच्या सोशल वॉरवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने सायबर कक्षातील पोलीस अधिक्षकांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारमार्फत सोमवारी बदलीचे आदेश जाहीर केले आहेत.
या अधिकाऱ्यांचा समावेश-
संजय शिंत्रे पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांची बदली पोलीस अधीक्षक, सायबर कक्ष मुंबई येथे करण्यात आली आहे. महेश पाटील यांची बदली पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे येथून पोलीस उपायुक्त (गुन्हे) मीरा भाईंदर, वसई, विरार, पोलीस आयुक्तालयात करण्यात आली आहे. पंजाब राव उगले यांना गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही पदावर नेमण्यात आले नव्हते. त्यांना पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे येथे नियुक्ती दिली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची बदली मुंबईच्या लोहमार्ग पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. रवींद्र सेणगावकर मुंबईचे लोहमार्ग पोलीस आयुक्त आहेत. त्यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे करण्यात आली आहे.
भाजपच्या सोशल विभागावर सरकारचे लक्ष?
दरम्यान, देशासह राज्यात सोशल वॉर रंगला आहे. गृहमंत्री अनील देशमुख यांनी भाजपच्या आयटी सेलने सचिन, लता मंगेशकर यांच्यासदर्भात माझ्या शब्दांचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे. अशातच आता सायबर सेल विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्यामुळे भाजपच्या सोशल विभागावर सरकारचे लक्ष राहणार असल्याचे बोलले जात आहे. महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लालुचपत प्रतिबंधक विभाग, लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या या बदलीत समावेश आहे.
हेही वाचा- कोरोनाची वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब - राजेश टोपे