मुंबई - मुंबईच्या ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सुरक्षेच्या कारणाने मॉलमध्ये आत जाण्यास बंदी घालण्यात आल्याने येथील दुकानदार संतप्त झाले आहेत. आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आम्हाला आगीमधून वाचलेले सामान घेऊ द्या, आम्हाला सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी दुकानदार संघटनेचे माजी अध्यक्ष महेंद्र कुबडिया यांनी "ई टीव्ही भारत"शी बोलताना केली आहे.
हेही वाचा - प्रभादेवीत इमारतीला भीषण आग; जीवितहानी नाही
मॉलमध्ये जाण्यास बंदी
मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याने धोकादायक परिस्थिती व आगीची चौकशी सुरू असल्याने मॉलमध्ये जाण्यास बंदी केली आहे. त्यामुळे या मॉलमधील दुकानदार संतप्त झाले आहेत. मॉलसमोरच हे दुकानदार आणि त्यात काम करणारे कर्मचारी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आहेत. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.
'सरकारने आर्थिक मदत करावी'
आमची दुकाने या मॉलमध्ये आहेत. ४० ते ५० लाख खर्च करून आम्ही आमची दुकाने सुरू केली होती. मॉलला लागलेल्या आगीत आमची दुकाने जळाली आहेत. काहींचे दुकानामधील त्यामधील सामान वाचले असू शकते. जे काही वाचलेले सामान आहे ते आम्हाला बाहेर काढू द्या. आज आमचे मोठे नुकसान झाले आहे सरकारने आम्हाला आर्थिक मदत केली पाहिजे, अशी मागणी येथील दुकान मालकांची आहे, अशी माहिती कुबडिया यांनी दिली.
हेही वाचा - पुण्यात फॅशन स्ट्रीटला भीषण आग, दोनशे पेक्षा जास्त दुकाने जळाली
११ मृत्यू
ड्रीम्स मॉलला गुरुवारी रात्री १२च्या सुमारास आग लागली होती. काल रात्री ११च्या सुमारास तब्बल २३ तासांनी अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या आगीप्रकरणी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदले यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही आग कशी लागली, बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले होते का, मॉलकडे अग्निसुरक्षा यंत्रणा होती का, याची चौकशी करून पुढे अशा घटना घडू नये म्हणून काय करावे याबाबतचा अहवाल १५ दिवसात सादर केला जाणार आहे.