मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या दिवशी विविध प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी 17 जणांची निवड करण्यात आली आहे. मात्र या अधिकृत यादीत सेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव वगळण्यात आले आहे. पक्षाच्या भूमिकेविरोधात वेगवेगळी विधाने करणाऱया संजय राऊत यांना विधानसभा निवडणुकीत भूमिका मांडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या चर्चेचे वातावरण आहे.
सेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या शिवसेना भवन येथून दिनांक 21 आणि 24 ऑक्टोबरला विविध प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी निवडलेल्या प्रतिनिधींची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी, आमदार मनीषा कायंदे, अनिल परब, खासदार भावना गवळी, धैर्यशील माने या नावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सेनेकडून पहिल्यांदाच सचिव सूरज चव्हाण, नगरसेविका शीतल म्हात्रे, विशाखा राऊत, माजी महापौर शुभा राऊळ, माजी आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे यांना स्थान देण्यात आले आहे.
तसेच युवासेनेपैकी युवासेना सचिव वरूण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, किशोर कन्हेरे यांचाही अधिकृत प्रतिनिधी म्हणून यादीत समावेश आहे.
याबाबत शिवसेनेचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांना विचारल्यानंतर, संबंधित यादी फक्त माध्यमांवर भूमिका मांडण्यासाठी जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी तुम्ही संजय राऊत यांच्याशी उद्या बोलून शकता, असे प्रधान यांनी सांगितले.