मुंबई - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेतील बंडखोरीनंतर ( Mla sanjay shirsat comment on uddhav thackeray ) शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेतून पालापाचोळा गेला असे सांगताना बाळासाहेबांच्या नावाशिवाय निवडून या, असे आव्हान त्यांनी केले. यावर शिंदे गटाचे बंडखोर ( Sanjay shirsat on Balasaheb ) आमदार संजय शिरसाट यांनी, बाळासाहेब म्हणजे तुमची प्रॉपर्टी नाही. ते प्रत्येक शिवसैनिकांचे दैवत आहे. त्यामुळे पुन्हा असा उल्लेख करू नका, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला आहे.
शिवसेनाप्रमुख तुमची प्रॉपर्टी नाही - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या दै. सामनाला आज काही अंशी मुलाखत दिली. संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून यामध्ये बंडखोरांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. बंडखोर आमदारांनी यावरून आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादचे शिंदे गटात गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनाप्रमुखांची उंची तुम्ही कमी करू नका. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही घडलो आहोत. त्यांना तुम्ही छोट करण्याचा प्रयत्न करत आहात. राजकारण करायचे असेल तर स्वतःचा ठसा उमटवा. आजही पहिले छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते. त्या दर्जात उच्च पदाला गेलेला हा माणूस आहे. त्याला खाली खेचण्याचे काम करू नका. शिवसेना प्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, ते प्रत्येक शिवसैनिकांचे दैवत आहे. त्यामुळे, पुन्हा असा उल्लेख करू नका, असा सल्ला शिरसाट यांनी दिला आहे.
पालापाचोळा कोणाला म्हणताय? - पालापाचोळा कोणाला म्हणताय असा जाब शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना विचारताना जुन्या शिवसैनिकांची आठवण करून दिली. सरपोतदार, लीलाधर डाके हे काय पालापाचोळा आहेत का? मनोहर जोशी आजही आहेत. या मोठ्यांच्या सावलीत आम्ही वाढलो, या नेत्यांनी गावात खेड्यात जाऊन शिवसेना रुजवायचे काम केले. त्यांना पालापाचोळा म्हणता येणार नाही. उद्या तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटले तर काय होईल, असा सवाल शिरसाट यांनी केला. तसेच लीलाधर डाके, मनोहर जोशी तुमच्या बरोबर बसलेले दिसत नाहीत. हे काळाबरोबर बदलत जात असून नव्याने स्वागत करा. पण, आपल्या घरातल्यांना विसरू नका, असेही शिरसाट म्हणाले.
सत्तेत जाण्यासाठी उठाव नाही - सत्तेत जाण्यासाठी शिंदे साहेबांनी हा उठाव केला नव्हता. त्यांच्याकडे नगर विकास सारखे महत्त्वाचे खात आहे. मी आजारी असताना घडलेला हा प्रकार असल्याचे ठाकरे सांगत आहेत. हे सगळे खोटे आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी अभिषेक केला. परंतु, ही दोन वर्षांपासूनची प्रक्रिया आहे. ते बरे झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला नको आहेत, असा आम्ही म्हटले. पण, आजही मुलाखतीतून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच मोठे म्हटले याचे वाईट वाटत असल्याचे शिरसाट म्हणाले.