मुंबई - राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभेपूर्वी टीझर लॉन्च करत शिवसेनेला आव्हान दिले होते. त्यानंतर आता, शिवसेनेकडून येत्या १४ तारखेला होणाऱ्या सभेचा टीझर लॉन्च केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ वापरून 'खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार, ऐकायला यायलाच पाहिजे,' असे त्यामध्ये म्हटले ( Shivsena Rally Teaser Release ) आहे.
राज्यात राजकीय तापले आहे. मशिदींच्या भोंग्यांवरून सुरू झालेले राजकारण हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळले आहे. शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत युती केली, त्यानंतर सत्तेसाठी लाचार सेनेने हिंदुत्व सोडले, अशी टीका भाजपकडून केली जात आहे. मनसेने त्यात उडी घेत शिवसेनेच्या हिंदुत्वाला आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. मात्र, त्याच पूर्वी शिवसेना आणि मनसे असा वाद रंगला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे शिवसेना विशेष करून पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर जोरदार निशाणा साधला आहे. या घडामोडींना प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या 14 तारखेला जाहीर सभा होणार आहे. या सभेचा टीझर नुकताच लॉन्च झाला आहे.
काय आहे टीझरमध्ये? - 'मी शिवसेना प्रमुख जरूर आहे. पण, तुमची ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे,' असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील व्हिडिओ टीझरमध्ये वापरण्यात आला आहे. तसेच, 'साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे', असे आवाहन देखील यामधून करण्यात आले आहे.
'१४ तारखेला मास्क काढतो' - मुंबई महापालिकेच्या 'सर्वांसाठी पाणी' या नव्या धोरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी, मास्क काढल्यापासून माणसात आल्यासारखे वाटत आहे. मला अनेक गोष्टी बोलायच्या आहेत. मनपाचा कार्यक्रम असल्याने येत्या १४ तारखेला होणाऱ्या जाहीर सभेत सर्वांचे मास्क काढतो, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे.
हेही वाचा - Rana Couple : राणा दाम्पत्याचा माध्यमांशी संवाद; जामीन रद्द करण्यासाठी शिवसेना न्यायालयात जाण्याची शक्यता