मुंबई - दुसऱ्यावर आरोप करत असताना नारायण राणेंना (Narayan Rane) कदाचित त्यांच्या वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल. मुलांच्या उपद्व्यापामुळे ते विसरले असतील. सिधुदुर्गमध्ये 9 वर्ष खून, दरोडे होत होते, हे खून कोणी केले आणि कोणी पचवले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे.
राणेंची कुंडली आम्हीच सांगत नाही तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ती वाचली होती. आम्ही गृहमंत्र्यांना भेटून सिंधुदुर्गमध्ये हत्या झाल्या याचे खरे प्लॅनर कोण होते याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. राणेंसारख्या माणसाने भ्रष्टाचारासारखे आरोप करणे यापेक्षा मोठा विनोद असू शकत नाही, असे विनायक राऊत म्हणाले.
दिशा सालियन प्रकरणावरून राजकारण -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियन प्रकरण आणि शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईचा इशारा दिला. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यानंतर पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड निकला कचरा अशी अवस्था झालेली दिसते. भाजपच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी केविलवाणी परिस्थिती राणेंची आहे. स्वार्थासाठी लाचारी पत्करत आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच राणेंचे आरोप निराधार असून वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल, मुलांच्या उपद्वापामुळे स्मरणात राहत नसेल तर त्यांचा भूतकाळ त्यांना सांगावा लागेल, असा इशारा राऊत यांनी दिला. तसेच गेल्या नऊ वर्षात अनेक राजकीय हत्या झाल्या. खंडण्या उकळणे गेल्या, मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे यांचा निर्घुणपणे खून कोणी केला? हे कोणी पचवले? श्रीधर नाईकच्या खुनातील आरोपी कोण होते? हे आम्हाला उघड करा लावू नका, असे राऊत म्हणाले. या सर्व राजकीय हत्यांची चौकशी व्हावी, याकरिता उद्या राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.