मुंबई - भाजपा आणि कॉंग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी सोबतच्या युतीबाबत मत व्यक्त केले आहे.
'...तर राज्यात चमत्कार होईल'
हल्ली राजकीय पक्षांना स्वबळाचे अजीर्ण नक्कीच झाले आहे. भाजपा म्हणते आम्ही स्वबळावर लढू. भाजपा एकटाच आहे. त्यामुळे स्वागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. सरकारमध्ये राहणार पण स्वबळावर लढणार, असे त्यांनी सांगितले आहे. त्यांचेही स्वागत आहे. मग राहिले कोण? तर शिवसेना आणि राष्ट्रवादी. हे दोन्ही पक्ष राज्यातील प्रमुख आणि मोठे पक्ष आहेत. आम्ही दोघांनीही स्वबळाची भाषा केलेली नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असे राऊत म्हणाले.
अग्रलेखातूनही युतीचे संकेत
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना'च्या अग्रलेखात राष्ट्रवादीसोबत युती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात ‘स्वबळ’ दाखवण्याची स्पर्धा सुरु आहे. कारणही तसेच आहे, येऊ घातलेल्या निवडणुका. पहिल्यादा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले, त्यात भरीस भर म्हणजे हायकमांडला मान्य असेल तर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार मी होईन, असेही त्यांनी जाहीर केले. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन पक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आता आजच्या (गुरूवार) सामना अग्रलेखातून महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणाचे भाकित वर्तवण्यात आल आहे. 'भाजपा आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल’, असा सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा -अँटिलिया प्रकरण; प्रदीप शर्मांना एनआयएकडून अटक