मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. काही लोक यातही राजकारण करत असून ही राजकारणाची वेळ नाही. अशा वेळेत राजकारण करणाऱ्यांनाच क्वारन्टाईन करा, या शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्री राज्यात फोफावत असलेल्या कोरोना व्हायरसबाबतचा आढावा घेऊन त्यासंबंधी काही निर्णय घेत आहेत. या परिस्थितीत काही विरोधक समाज माध्यमांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गवगवा करत असून हे चुकीचे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपचे विधानपरिषदेतील आमदार निरंजन डावखरे यांनी या परिस्थितीत अनुभवी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असायला हवे होते, असे ट्विट केले आहे. तसेच प्रशासनाचा शून्य अनुभव असलेल्या ठाकरे यांच्यापेक्षा आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची गरज असल्याचे डावखरे यांनी म्हटले होते.
याशिवाय समाज माध्यमात काही लोकांककडून देवेंद्र फडणवीस नावाचा हॅश टॅगही चालवण्यात आला होता. यासंबंधी संजय राऊत यांनी राजकारण करणाऱ्यांवर आगपाखड केली आहे. राज्यात परिस्थिती अजून हाताबाहेर गेली नाही. सरकार आपला प्रयत्न करत आहे. विरोधीपक्षाने संकट काळात कसे काम करावे हे शिकण्याची गरज आहे. आजही आम्ही देशाची काळजी करून देश नेतृत्वाला सहकार्य करण्याचे काम करत आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा काही भाजपच्या लोकांना क्वारन्टाईन करण्याची गरज असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -
इटलीच्या कोरोनाग्रस्ताचा जयपुरात मृत्यू; देशभरात ५ जण दगावले
कोरोनाचे ३ नवीन रुग्ण, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात
VIDEO : 'कोरोना' उद्रेक, अन् चीनमधील अनुभव.. विशेष मुलाखत - भाग ३