मुंबई - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून स्वत:चा गट स्थापन केला आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार आहेत. निधी मिळत नाही आणि मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळत नाही, असा आरोप आमदारांनी केला आहे. त्यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे सोडून गेलेत त्यांनी निधी मिळत नाही, मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळत नाही असे आरोप केलेत. पण, आता स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व गोष्टींचे ऑडीट करायला सुरुवात केली आहे. याची सर्व कागदपत्रे लवकरच तुमच्यासमोर सादर केले जातील, अशी माहिती दानवे यांनी दिली.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, बंडखोरांबाबत घेणार मोठा निर्णय
जे पक्ष सोडून गेले त्यांनी आरोप केलेत की, मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. आम्हाला निधी मिळत नाही. पण, आता स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व गोष्टींचे ऑडीट करायला सुरुवात केली आहे. कारण हे सर्व आरोप खोटे आहेत. या सर्वांना मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत आणि या सर्वांना त्यांचा निधी देखील वेळच्यावेळी मिळाला आहे. याची सर्व कागदपत्रे देखील लवकरच तुमच्या समोर सादर केले जातील, अशी माहिती शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दिली.
निधीत दुजाभावाचे अजित पवारांनीही केले खंडण - एकनाथ शिंदे गटाने सातत्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आमदारांची गळचेपी होत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेना आमदारांना निधी दिला जात नसल्याचाही आरोप एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येतोय. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सरकार अस्तित्वात आले त्यावेळेस 36 पालकमंत्री नेमण्यात आले. तिन्ही पक्षाचे समान पालकमंत्री नेमण्यात आले. निधी देताना कोणतीही काटछाट करण्यात आली नाही. निधी वाटताना आपण कधीही दुजाभाव केला नाही. सर्वांना विकास कामांमध्ये मदत करण्याची भूमिका नेहमीच ठेवली आहे. निधीबाबत काही प्रश्न उपस्थित राहत असतील तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होत असताना त्याबाबत भूमिका मांडायला हवी होती. त्यामुळे, समज गैरसमज दूर झाले असते, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. या बैठकीच्या आधी अनेक अफवा पसरवण्यात आल्या. इतके जिल्हाप्रमुख शिल्लक तितके जिल्हाप्रमुख शिल्लक, पण आजच्या बैठकीला जवळपास सर्वच पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुख उपस्थित होते. इतकेच नाही तर या सर्वांनी पुन्हा एकदा नव्याने पक्ष संघटना बांधण्याचा निर्धार केला आहे, अशी माहितीही दानवे यांनी दिली.