मुंबई - शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे. तीन कृषी कायद्यांमुळे शेतकरी आनंदी नसतील तर यावर केंद्र सरकारने विचार करायला हवा. तसेच या आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही संबोधून त्यांचा अपमान करणे योग्य नाही. त्यामुळे शेतकऱयांच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा निघावा, असे मत शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - ...मग तुम्ही तरी शेतकऱ्यांविषयी बोला ना, छगन भुजबळांचा सेलिब्रिटींना चिमटा
देवेंद्र फडणवीसांवर टीका
यावेळी बोलताना उर्मिला मातोंडकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा टीका केली. देवेंद्र फडणवीस हे सरकारबद्दल बोलताना मुघल सरकार असा शब्द वापरतात. हा शब्द फार जपून वापरला पाहिजे. शर्जील उस्मानी नावाच्या व्यक्तीने पुण्यामध्ये एल्गार परिषदेत हिंदू धर्माबद्दल वापरलेला शब्द अतिशय चुकीचा आहे. त्याच्यावर मुंबई पोलीस नक्कीच कारवाई करतील, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
हेही वाचा - 'शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीपैकी 15 हजार कोटी सरकार भरणार, विलंब आकार माफ'
उर्मिला मातोंडकर यांचा आज वाढदिवस
विलेपार्लेमध्ये आज शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी त्यांचा वाढदिवस लहान मुलांसह वयस्कर महिलांसोबत साजरा केला. यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी लहान मुलांना गाणे गाऊन दाखवले. उर्मिला मातोंडकरचा आज ४७वा वाढदिवस आहे. ४ फेब्रुवारी १९७४ ला मुंबईत उर्मिलाचा जन्म झाला. गेल्या अनेक वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रीय असते. २०१४ मध्ये 'आजोबा' सिनेमात तिने अखेरचं काम केलं होतं.