मुंबई - आज संविधान दिवस आहे. केंद्र सरकारकडूनदेखील संविधान दिवस पाळला जात आहे. मात्र यावरती शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केंद्र सरकारवर केली आहे. देशात संविधान पायदळी तुडवले जात आहे. राज्याचे आणि नागरिकांचे अधिकार पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे संविधान दिन (Samvidhan Din) पाळण्याचे नाटक कशासाठी, असा सवाल राऊत यांनी केंद्र सरकारला केला आहे. संविधान दिनानिमित्त आज केंद्र सरकारने सेंट्रल हॉल(Central Hall Of Parliament)मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. शिवसेने(Shiv Sena)नेही या बहिष्काराला पाठिंबा देत या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे.
विरोधी पक्षांकडून बहिष्कार
हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरां(Dr. Babasaheb Ambedkar)नी घटना समितीत काही मुद्दे मांडले होते. ते महत्त्वाचे आहेत. राज्य आणि जनतेला अधिकार दिले आहेत. पण त्यांचे अधिकारी पायदळी तुडवले जात आहेत. सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (nationalist congress party) जाणार की नाही याबाबत मला माहीत नाही. पण विरोधी पक्षानेच बहिष्कार टाकला आहे. बहिष्कार टाकण्याचे कारण म्हणजे या देशात दररोज संविधान पायदळी तुडवले जात आहे.
'हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे कारभार'
संविधानाचे राज्य या देशात राहिले नाही. हुकूमशाही पद्धतीने काम चालले आहे. राज्याचे अधिकारदेखील हिरावून घेतले जात आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर राजभवनात संविधानाच्या बाबतीत काय चालले आहे, हे सर्वांना माहीत आहे. यामुळे संविधान दिन पाळण्याचे नाटक कशासाठी करता, असा सवाल राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.