मुंबई - शिवसेना भवनात भगवा झेंडा फडकवत शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साजरा केला. यावेळी सोशल डिस्टंन्स पाळत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते पुन्हा मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले.
यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार संजय राऊत, राहुल शेवाळे आणि शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई उपस्थित होते. शिवसेनेच्या 54 वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, तसेच पक्षातील पदाधिकारी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेनेचा वर्धापनदिन आणि दसरा मेळावा हा एकप्रकारे शिवसैनिकांसाठी वैचारिक मेजवानी असते. वर्धापनदिनाच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतात. तसेच वर्षभरात काय काम करता येईल, याबाबतीतही मार्गदर्शन केले जाते. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मोठ्या उत्साहाने मुंबईत दाखल होत असतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे हा सोहळा सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येणार नाही.
दरवर्षी, हा वर्धापन दिवस षण्मुखानंद हॉल येथे साजरा होतो. तर 2018 मध्ये पावसामुळे गोरेगाव येथील नेस्को येथे साजरा करण्यात आला होता.