मुंबई - कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. तब्बल नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने संजय राऊतांना समन्स बजावले. त्यामध्ये ईडी कार्यालयात यावे लागेल, असे सांगण्यात आलं होते. त्यानुसार संजय राऊत ईडी कार्यालयात गेले आहेत. त्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र, राज्य सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. देशात इतक्या निर्लज्जपणे कारस्थान लाज, लज्जा सोडून दडपशाही, दमनशाही सुरू आहे. नव्याने हिंदुत्वाचा पुळका आलेले काही जण, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा गळा घोटण्याचे काम करत आहेत, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला ( uddhav thackeray angry ed detained sanjay raut ) आहे.
'आपण मोठं केले ते शेफारली आणि तिकडे गेली' - उद्धव ठाकरे म्हणाले, काही जणांना मातोश्रीने जरा जास्तच प्रेम दिलं होत आणि त्या प्रेमाचे काटे टोचायला लागले म्हणून आता पलिकडे गेले. बरं गेले ते गेले मातोश्रीहून दिल्लीला पळतात. काल सुध्दा कसे पळालेत ते पहायला मिळाले, अडीच वर्षात असं कधीही झाल नव्हतं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिमाखाने शानदारपणे राज्य करण्याचा प्रयत्न केला. कोणतही दडपण माझ्यावरती नव्हतं, कुणीही बेल वाजवल्यानंतर जर जेवत असलो तर जेवण अर्धवट टाकून पळत या की पळत जाणारा मी मुख्यमंत्री नव्हतो. मात्र, आता पुन्हा एकदा काही काळापुरती का होईना हीच परिस्थिती महाराष्ट्रावरती ओढावली आहे. ज्यांना आपण मोठं केले ते शेफारली आणि तिकडे गेली, अशी टीकाही बंडखोर आमदारांवर ठाकरेंनी केली आहे.
'शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना...' - लोभापायी, दमदाटीपायी तिकडे जाताहेत, आता काल सुध्दा आपल्यातला एक तिकडे गेला त्याची प्रतिक्रिया पाहिली. कशासाठी लोक चाललीय? दुसरा मुद्दा काल मी एक पत्रकार परिषद घेतली कशासाठी घेतली होती? राज्यपालांच्या विरोधात नाही, कोश्यारीच्या विरूद्ध! त्यांना राज्यपालपदी बसण्याचा अधिकार राहिलेला नाही. राज्यपाल म्हणजे हे पद फार मोठ आहे. त्या पदाचा मान जसा आपण राखतो तसा त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने तो राखण्याची गरज आहे. भाजपचे जे कारस्थान आहे हिंदूंमध्ये फुट पाडायची मराठी अमराठी करायचं, मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि शिवसेना का संपवायची तर हिंदूंना आणि मराठी माणसांना ताकद देणारी ही संघटना ही एकदा संपली की महाराष्ट्र यांना चरायला मोकळा झाला. मोकळ कुरण मोकळ पडलय चरत बसा. कुरण म्हणजे गवत. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना एकदा का नातं तुटलं, तुटू शकत नाही. त्यांच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी ते तुटू शकत नाही. तुटणारच नाही पण त्यांच्या प्रयत्नच तसा आहे की शिवसेना आणि ठाकरे नातं एकदा तोडलं की ती जी राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
'शिवसेनाप्रमुख हा एकमेव मर्द होता' - आज सुध्दा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी रोखठोक लिहिलेले आहे. त्याच्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. पण हे सगळ कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चाललेलं आहे की लाज लज्जा शरम सोडून हे कारस्थान चाललेले आहे. एक दमनशाही, दडपशाही सुरु आहे . हिंदुत्व त्याला हिंदुत्व हा शब्द बोलायचं तेव्हा कुणाचं धाडस होत नव्हत तेव्हा शिवसेनाप्रमुख हा एकमेव मर्द होता या देशामध्ये. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा कुठे होते आज जे बसलेत त्यांची नामोनिशाणी तरी होती का? काय केल त्यांनी? पण तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या हातामध्ये सत्ता नव्हती, तुमच्या सारखे जिवाला जीव देणारे शिवसैनिक आणि त्यांच्या जोरावर त्यांनी सांगितले अमरनाथ यात्रे मध्ये जर का वेडे वाकड घडल तर मी इकडून तुमची हजला जाणारी विमान उडू देणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
'मेलो तरी बेहतर पण धर्म नाही सोडणार' - जर या देशामध्ये लोकशाहीचा खून होणार असेल हत्या होणार असेल, जे सरन्यायाधीश बोलले विरोधी पक्षाला दुश्मन समजू नका, आता विरोधी पक्ष तर लांबच आहे. पण, एकेकाळी मित्र पक्षच होता त्याचा सुध्दा गळा घोटण्याचे काम सुरु आहे. संजय राऊतांची जी ईडीची चौकशी सुरु आहे ते तेच सुरु आहे. हिंदूंचा मराठी माणसाचा शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय त्याचाच गळा घोटायचा. काल अर्जुन खोतकरने ते दडपण मान्य तरी केल. घाबरणारे शिवसैनिक असूच शकत नाही. दडपणाला घाबरणारा बाळासाहेबांचा आणि ठाण्याचा आनंद दिघेंचा शिवसैनिक असूच शकत नाही. जे आनंद दिघे दोन सव्वा दोन वर्ष तुरूंगात होते घाबरले? नाही नाही मला तुरूंगात नका नेऊ हो मला सोडून द्या. टाका किती दिवस टाकाल म्हणूनच त्यांना धर्मवीर म्हणतात. मेलो तरी बेहतर पण धर्म नाही सोडणार, मेलो तरी बेहतर पण पक्ष नाही सोडणार पक्षाशी निष्ठा कशी असते त्या धर्मवीरांचे नाव आज जे घेताहेत त्यांच्या तोंडी शोभत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना नाव न घेता लगावला आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : संजय राऊतांच्या घरातून ईडीने 11.50 लाख रुपये केले जप्त; छापेमारीदरम्यान सापडली रक्कम