मुंबई - दक्षिण मुंबईतील आपला माणूस म्हणून ओळख असलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर शिवडीतील शिवसैनिकांनी जल्लोष केला. ढोल वाजवत, फटाके फोडून व नाचत एकमेकांना लाडू भरवून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
शिवडीतील सुपुत्र असलेल्या अरविंद सावंत यांच्या जुन्या घरासमोर शिवसेनेच्या वतीने स्क्रीन लावून एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा लाईव्ह दाखवण्यात आला. लहान मोठे शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.
आपला माणूस दिल्लीत गेला आणि कॅबिनेट मंत्री झाला, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली. गल्लीतील आपला माणूस दिल्लीत गेल्याने मुंबईचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला.