मुंबई - महाराष्ट्रातल्या 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा 18 जानेवारीला निकाल जाहीर झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यस्तरावर पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढवली जात नाही, पण ग्रामपंचायतींमध्ये मोठे नेते आपले पॅनेल उभे करतात. त्यामुळे या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता हळूहळू निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे. शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मैदान मारले आहे. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर असून, काँग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
भाजपाचा दावा
१२, ७११ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने ३ हजार ११३ जागा जिंकल्या असून, सर्वाधिक जागा जिंकणारा पहिल्या क्रमाकाचा पक्ष ठरला आहे. भाजपाने २ हजार ६३२ जागा जिंकल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी २४०० जागांसह तिसऱ्या क्रमाकावर आहे. काँग्रेसनेही राज्यात १८२३ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३६ जागी विजय मिळविला आहे. तर २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे. परंतु असे असले ग्रामपंचायत निवडणुकित आपण अग्रस्थानी असल्याचा भाजपाचा दावा आहे.
'जनतेचा आमच्यावर विश्वास'
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. फडणवीस म्हणाले "या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे व एकंदरीत जनतेने पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवलेला आहे. याकरता मी जनतेचे आभार मानतो व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो."
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलेली आकडेवारी
- मतदान झालेल्या एकूण ग्रामपंचायती : 12,711
- आतापर्यंत हाती आलेले निकाल : 7233
- भाजपा : 3131 (44 टक्के)
- एकूण सदस्यांच्या जागा : 1,25,709
- बिनविरोध : 26,718
- आतापर्यंत हाती आलेले निकाल : 44,887
- भाजपा : 18629 (42 टक्के)
- विदर्भातील ग्रामपंचायत निकाल
- चंद्रपूर : एकूण 604/भाजपा : 344
- गोंदिया : एकूण 181/भाजपा : 106
- भंडारा जिल्हा : एकूण : 145/भाजपा: 91
- वर्धा जिल्हा : एकूण : 50/भाजपा : 29
- नागपूर जिल्हा : एकूण 127/ भाजपा : 73
- वाशीम जिल्हा : एकूण 152/भाजपा : 83
- अकोला जिल्हा : एकूण 214/भाजपा : 123
- बुलढाणा जिल्हा : एकूण 498/भाजपा : 249
- अमरावती जिल्हा : एकूण 537/भाजपा : 113
- यवतमाळ जिल्हा : एकूण 925/भाजपा 419
- (गडचिरोलीतील 170 जागांवर मतमोजणी 22 जानेवारी रोजी)
- विदर्भ : एकूण : 3433/भाजपा : 1630