मुंबई - मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीदरम्यान तटस्थ भूमिका घेतली. तर, राष्ट्रवादी आणि समाजवादीने शिवसेनेला मतदान केल्याने शिवसेनेच्या संध्या दोशी विजयी झाल्या.
शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेने संध्या दोशी यांनी उमेदवारी दिली. भाजपाकडून सुरेखा पाटील यांनी तर, काँग्रेसकडून संगीता हंडोरे यांनी अर्ज भरला होता. समितीत शिवसेना 11, भाजपा 10, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 1, समाजवादी पक्ष 1 असे सदस्य आहेत. आज झालेल्या निवडणुकीत एकूण 26 मते पडली. शिवसेनेच्या संध्या दोषी यांना शिवसेना, राष्ट्रवादी व सपा अशी एकूण 13 मते मिळाली. काँग्रेसचे 4 सदस्य तटस्थ राहिले. 4 मते अवैध ठरली तर, भाजपाला 7 मते मिळाली. यामुळे शिवसेनेच्या संध्या दोशी यांचा अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.
याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, राज्यात वेगळे राजकीय समीकरण बनले आहे. यामुळे आमदारांची कामे होत आहेत. त्यासाठी पालिकेतही नवे समीकरण झाले आहे. त्याच आधारे शिवसेनेच्या संध्या दोशी विजयी झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो विश्वास टाकला तो मी सार्थ करेन. येत्या सहा महिन्यांत जी काही कामे राहिली असतील ती पूर्ण करण्यावर भर देईन, असे नवनिर्वाचित अध्यक्ष संध्या दोशी यांनी म्हटले आहे.