मुंबई - शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालमधील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' मात्र आता यावरून राजकारण सुरू झाले असून, शिवसेनेची जी गत बिहारमध्ये झाली तीच गत बंगालमध्ये होईल, आम्ही शिवसेनेला गांभीर्याने घेत नाही असा टोला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
बंगालमध्ये शिवसेनेचे सरचिटणीस अशोक सरकार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या पक्षाने 294 पैकी किमान १०० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि संजय राऊत बंगालमध्ये येऊन प्रचार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावर प्रतिक्रिया देताना केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, बंगालमध्ये शिवसेनेचे अस्तित्व नाही, केवळ भाजपविरोध हाच शिवसेनेचा एकमेव अजेंडा आहे. त्यामुळे शिवसेनेला आम्ही गांभिर्याने घेत नाही, बिहारमध्ये त्यांची जी गत झाली तीच बंगालमध्ये होणार आहे.
बिहार निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
दरम्यान यापूर्वी शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूकही लढवली होती. बिहार निवडणुकीत शिवसेनेने 22 उमेदवार उभे केले होते, या निवडणुकीत शिवसेनेचा दारून पराभव झाला होता. त्यांचा 21 उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. सर्व उमेदवारांना मिळून बिहारमध्ये केवळ 20195 मते मिळाली होती.