मुंबई - मुंबईकरांनी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेला दिलेली साथ आणि आशीर्वाद यामुळेच यापुढेही पालिकेवर भगवा असाच फडकत राहील, असा ठाम विश्वास राज्याचे पर्यटन आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत सतत शिवसेनेचाच महापौर बसवा, अशा सूचनाही त्यांनी शिवसैनिक आणि नगरसेवकांना केल्या.
महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसवा -
२५ वर्षाहून अधिक काळ सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयाचे उदघाटन आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पालिका मुख्यालयात शिवसेनेचे नवीन दालन सुरु झाल आहे. येथे माजी महापौरांना बसण्यासाठी दालन ठेवण्यात आले आहेत. अशी दालने आणखी वाढत राहू देत असे म्हणत शिवसैनिक आणि नगरसेवकांनी सतत शिवसेनेचा महापौर महापालिकेत बसवावा अशा, सूचना आदित्य ठाकरे यांनी केल्या.
‘नॉन कोविड’ कामे लवकरच सुरू होतील -
कोरोना असताना रस्ते, पुलांसह अत्यावश्यक सेवेतील बहुतांशी कामे सुरू राहिली. त्यामुळे कोरोना लढ्याचे सुप्रीम कोर्टासह पंतप्रधानांनीही पालिका, महापौर, आयुक्तांचे कौतुक केले आहे. आता कोरोना पूर्ण नियंत्रणात आलाय. त्यामुळे तिसरी लाट येऊच नये, अशी भावना व्यक्त करीत मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व ‘नॉन कोविड’ कामेही लवकरच सुरू होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकल, निर्बंधांचा निर्णय तज्ञांशी बोलूनच -
मुंबईमधील कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंधांची आवश्यकता आहे. मुंबईमधील लोकल सुरु करणे किंवा निर्बंध हटवणे याबाबत जो काही निर्णय होईल तो आरोग्य विभागातील तज्ञांशी बोलूनच होईल आदित्य ठाकरे यांनी सांगितले.