मुंबई - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath on Hanuman Chalisa) हे हनुमानाला दलित म्हणाले होते, त्याची पूजा करु नका, असेही त्यांनी सांगितले होते. या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला प्रश्न विचारला आहे. हनुमानाला दलित म्हणणारे कधीपासून हनुमानभक्त झाले?, असे राऊत म्हणाले. सध्या भोंगा, हनुमान चालीसावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आजकाल नवा हिंदू ओवैसी जन्माला आले असून, हिंदुत्वाचे राजकारण करत आहेत. परंतु, हिंदुत्वावर बोलायची त्यांची लायकी नाही, असा घणाघातही संजय राऊत यांनी भाजपवर केला. येत्या ८ जूनला मराठवाड्यात शिवसेना जाहीर सभा घेणार असल्याचेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचे राजकारण - महाराष्ट्रात हनुमानाचे नाव घेणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते, हे पाहून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना दु:ख झाले असेल, असे विधान केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले होते. या विधानाचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. त्यांना बाळासाहेबांची काळजी करण्याची गरज नाही. हनुमान चालीसाच्या नावाखाली तुम्ही देशाचे विभाजन करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे राजकारण करत आहात आणि आम्ही तुमच्याशी लढत आहोत, हे पाहून बाळासाहेबांना नक्कीच आनंद होईल, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी अश्विनीकुमार चौबे यांच्या विधानावर दिले आहे.
शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप - सध्या राज्यात भोंगा, हनुमान चालीसा पठण या मुद्द्यांवरून राजकारण तापले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरणारे राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहेत. या विषयावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Sharad Pawar Replied To Raj Thackeray : '...म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो', शरद पवारांचे प्रत्युत्तर
मशिदींच्या भोंग्यांवरून सुरू झालेले राजकारण हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळले आहे. शिवसेनेने धर्मनिरपक्ष पक्षांसोबत युती केली, त्यानंतर सत्तेसाठी लाचार सेनेने हिंदुत्व सोडले, अशी टीका भाजपकडून केली जात आहे. सध्या मनसेने त्यात उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर १ मे ला सभांचा धुरळा उडणार आहे. मनसेकडून ५ जून रोजी अयोध्येला जाण्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाला आव्हान देण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.
हिंदुत्वासाठी शिवसेनेचा त्याग - शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत संघटनात्मक बांधणी, पक्षाचा विस्तार यावर चर्चा झाली. आज हिंदुत्वावर भाजप आणि मनसेकडून बोलले जात आहे. पण हिंदुत्वाशी काय संबंध? या देशात सगळ्यात जास्त हिंदुत्वासाठी त्याग शिवसेनेने केला आहे. हिंदुत्वासाठी आवाज उठवल्याने बाळासाहेब ठाकरे यांना सहा वर्षे मतदानापासून वंचित ठेवण्यात आले होते. शेकडो शिवसैनिकांनी बलिदान केले. त्यावेळी हे सगळे होते कुठे? असा सवाल उपस्थित करत भाजप आणि मनसेचा राऊत यांनी खरपूस समाचार घेतला.
शिवसेनाच हिंदुत्वाची रक्षक - हिंदुत्वावर बोलणाऱ्यांनी हिंदुत्वासाठी रक्त सोडा, साधा घाम तरी सांडला आहे का? असल्या बोगस आणि भंपक लफंगांची हिंदुत्वावर बोलण्याची लायकी नाही, असे टीकास्त्र ही राऊत यांनी सोडले. भाजपकडून ज्याप्रकारे मत कापण्यासाठी ओवेसी उभे केले आहेत. त्याचप्रमाणे काही हिंदू ओवेसी उभे केले जात आहेत. जे त्यांच्यावर नंतर उलटेल. मराठी असो किंवा हिंदू समाज हा शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा राहिला असून बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी रक्षक असल्याचे राऊत म्हणाले.