मुंबई - मराठी मतदारांबरोबर गुजराती मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. मुंबईतील गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी आगळी-वेगळी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या मथळ्याखाली मतदार मेळावे घेण्याचे ठरवले आहे. याबाबत गुजराती माणसाला काय वाटतं? हे जाणून घेण्यासाठी इटीव्ही भारताचा विशेष रिपोर्ट..
मुंबईतील गुजराती मतदार हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार समजला जातो. गुजराती लोकांची एक मोठी वोट बँक आहे. हा मतदार आपल्याकडे आकर्षित व्हावा यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. मात्र मेळाव्याबाबत गुजराती लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. या मेळाव्याचा फायदा होईल ही होणार ही नाही, अशा प्रतिक्रिया गुजराती माणसांकडून येत आहेत.
गुजरातींचा शिवसेनेत प्रवेश-
मुंबईतील गुजराती भाषिक मतदार हे भाजपाच्या गोटातील पारंपरिक मतदार समजले जातात. घाटकोपर, मुलुंड, कांदिवली असे विविध भाग त्यांचे बालेकिल्ले समजले जातात. या बालेकिल्लाना सुरंग लावण्यासाठी शिवसेनेनं तयारी सुरू केली आहे. गुजराती बांधवांसाठी शिवसेनेच्यावतीने १० तारखेला जोगेश्वरीत मेळावा आयोजित केला गेला आहे. या मेळाव्यात साधारण १०० गुजराती भाषिक शिवसेनेत प्रवेश करतील, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजरातींना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी दिली गेली आहे. त्यांनी १० जानेवारीच्या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठीत निमंत्रण पत्रक केले आहे.
हे वाक्य घेऊन राजकारण योग्य नाही-
मुंबई मा.. जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ हे वाक्य चुकीचे आहे. हे वाक्य आम्ही गणपती बाप्पासाठी वापरतो. जलेबी ना फाफडा, गणपती आपडा’ हे खरं वाक्य आहे. हे वाक्य घेऊन राजकारण करणं योग्य नाही. आम्हाला नाही वाटत याने जास्त काही फरक पडेल. जेव्हा अस्तिमेचा विषय येतो मुंबईत आणि महाराष्ट्र सोबत कोण उभे रहाते हे सर्वांना माहीत आहे, अशी प्रतिक्रिया विरल शाह यांनी दिली आहे.
शिवसेनेने हिंदूत्वावर अटळ रहावे-
मुंबई आमची कर्मभूमी आणि जन्मभूमी दोन्ही आहे. मुंबई आणि शिवसेनेचे एक वेगळं नाते आहे. मला शिवसेनेला हेच सांगायचं आहे की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी पुढाकार घेतला होता तिचं बाब शिवसेनेने सुरू ठेवली पाहिजे. त्याच्यावर अटळ राहिले पाहिजे. शिवसेना आणि गुजराती माणसाचा आई आणि मावशी असा संबंध राहिलेला आहे, तो कायम राहील असे प्रिती जोशी यांनी सांगितले.
शिवसेनेने गुजराती लोकांना आकर्षित करण्यासाठी 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ घेतलेले हे वाक्य चांगले आहे. शिवसेनेला आमच्या गुजराती बांधवाकडून खूप खूप शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया राजाजी जोशी यांनी दिली आहे.