मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुद्वारा रकीबगंज येथे दिलेल्या भेटीचे शिवसेनेने 'सामना'तून स्वागत केले आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमेवर आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या लढाईचा अंत काय? असा सवालही 'सामना'च्या माध्यमातून मोदी सरकारला विचारला आहे. गुरुवाणीचा सारांश देताना, तुमची 'वेळ' येईल तेव्हा कर्मांचा 'हिशोब' होईल असा इशाराही मोदी सरकारला शिवसेनेने दिला आहे.
दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील रकीबगंज गुरुद्वारात अचानक भेट दिली. गुरु तेगबहादूर यांच्या समाधीपुढे पंतप्रधान नतमस्तक झाले. पंतप्रधानांच्या या कृतीला विरोधकांनी ढोंग आणि नाटक म्हटले, ही विरोधकांची टीका असल्याचे 'सामना'च्या 'गुरुवाणी, लढाईचा अंत काय?' अग्रलेखात म्हटले आहे. गुरुद्वारा भेटीत पंतप्रधान काय म्हणाले हे विस्ताराने सांगत, अग्रलेखात म्हटले आहे, की गेल्या एक महिन्यापासून पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतो आहे. हा शेतकरी 'शीख' म्हणजे लढवय्या समाज आहे. देशाच्या रक्षणासाठी शिखांचे योगदान मोठे आहे. अशा शिखांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरु असतानाच पंतप्रधान रकीबगंज गुरुद्वारात अत्यंत साधेपणाने गेले. पोलिसी सुरक्षेचा लवाजमा दूर ठेवून ते गुरुद्वारात गेले व तेगबहादूर यांच्या समाधीपुढे दंडवत घातला.
आंदोलनाचा अंत काय ?
पंतप्रधान गुरुद्वारात गेले तेव्हा तेथे 'गुरुवाणी' सुरु होती. त्याचा सारांश अग्रलेखात देण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे आहे, 'तुम्ही सेवा करता. ईश्वराची भक्ती करता. करीतही असाल, पण तुमचे विचार बदलले नाहीत तर त्या सेवेचा, भक्तीचा काय उपयोग? तुम्ही धर्मग्रंथांची अनेक पारायणे केली, परंतु त्यातील उपदेश, शिकवणूक तुम्ही समजून घेतली नाही, त्याचा अंगीकार मानवतेच्या कल्याणासाठी केलाच नाही तर धर्मग्रंथांच्या त्या पारायणांचा काय उपयोग? अशा वेळी जेव्हा तुमची 'वेळ' येईल, तुमच्या कर्मांचा 'हिशोब' होईल त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठे तोंड लपविणार? काळापासून कोणीही स्वतःचा बचाव करु शकलेले नाही आणि करु शकणार नाही, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा!' गुरुवाणीचा सारांश देताना तुमची वेळ येईल आणि कर्मांचा हिशोब होईल ही वाक्य अवतरणात देऊन शिवसेनेने शीख शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर भाजपला काय परिणामांना सामोरे जावे लागेल याचा इशाराच दिला आहे. साधारण महिन्याभरापासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा शेवट कसा असेल हा प्रश्नच असल्याचेही अग्रलेखातून सुचित करण्यात आले आहे.