मुंबई - आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सचिन वाझे आणि वरूण सरदेसाई यांच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, असा आरोप या वेळेस नितेश राणे यांनी केला होता. या सर्व प्रकरणावर वरूण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या आरोपांचे त्यांनी खंडण केले आहे. राणे कुटुंबीय हे माझ्या राजकीय जीवावरती उठले आहेत, असा गंभीर आरोप देखील यावेळी त्यांनी केला.
हेही वाचा - वाझे प्रकरणात शिवसेना युवानेत्याचे नाव; कोण आहेत वरूण सरदेसाई?
माझं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न - वरूण सरदेसाई
वरूण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरती झालेल्या सगळ्या आरोपांचं खंडण केलं. ते म्हणाले, मी एका सुसंस्कृत घरातून येतो. आमचा घरचा व्यवसाय आहे आणि गेले अनेक वर्ष मी युवासेनेचे काम पाहतो. माझं राजकीय अस्तित्व आहे ते संपवण्याचे काम राणे कुटुंबियांकडून सातत्याने होत आहे. एखाद्या प्रकारे राणे कुटुंबीय मला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. नितेश राणे यांनी माझ्यावरती जे आरोप लावले आहेत ते त्यांनी सिद्ध करावे, त्याच्या संदर्भात जे काही पुरावे असतील ते त्यांनी समोर आणावे, अन्यथा मी त्यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार आहे आणि कायदेशीर कारवाईसाठी राणे कुटुंबीयांनी आता तयार राहवे, अशी प्रतिक्रिया या वेळेस वरूण सरदेसाई यांनी दिली आहे.
दोषींवर कारवाई होईल - अनिल परब
या पत्रकार परिषदेत वरूण सरदेसाई यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब देखील उपस्थित होते. यावेळेस अनिल परब यांनी देखील राणे कुटुंबीयांवर आरोप करत राणे कुटुंबीय हे वरूण सरदेसाई यांच्या संदर्भात जी भूमिका मांडत आहे ती अत्यंत चुकीची असून, त्यांचे राजकीय जीवन संपवण्याचे षडयंत्र राणे कुटुंबीय करत आहेत. त्यामुळे माझं खुले आव्हान आहे, जर विरोधी पक्षाकडे शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याच्या विरोधात पुरावे असतील ते त्यांनी तपास यंत्रणेला द्यावे, तपास यंत्रणा त्याच्यावर काम करेल आणि जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे आमची भूमिका ही कायम आहे की, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. परंतु, आरोप करायचे आणि ते सिद्ध न करता पुन्हा पळून जायचं असं काहीसं काम विरोधी पक्षांकडून केले जात आहे, असा आरोप या वेळेस अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला.
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरणात नाना पटोले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा