मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत हे भाजप नेते किरीट सोमैयांवर सातत्याने आरोपांची सरबत्ती करतात. संजय राऊत यांनी ट्विट करत, किरीट सोमैय्यांनी ज्या कंपन्यावर आरोप केले होते, त्यांच्याकडून स्वतःच्या संस्थेकरिता दोन वर्षांनी देणग्या घेतल्याचा आरोप केला आहे. ही क्रोनोलॉजी समझिए, असे सांगत राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचार मुक्त संकल्प असलेला सोमैय्यांचा फोटो ट्विट करत राजकीय वर्तुळात राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.
संजय राऊतांचे किरीट सोमैयांवर नवे आरोप - राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप नेते किरीट सोमैयांकडून नेते, मंत्र्यांवर आरोपांचा भडीमार सुरू आहे. त्यातूनच केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत अनेक प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील सोमैयांनी कथित भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. राऊत यांनीही सोमैयांवर आरोप करत प्रत्युत्तर दिले आहे. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी सोमैया पिता - पुत्रांनी जमवलेल्या निधीत अफरातफर केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणानंतर गुन्हा दाखल झाल्याने सोमैया नॉट रिचेबल झाले. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून सोमैयांवर नवीन आरोप केले आहेत.
काय आहेत किरीट सोमैयांवर आरोप - सन 2013-14 मध्ये किरीट सोमैयांनी एका कंपनी विरोधात घोटाळ्याचे आरोप केले होते. संबंधित कंपनीच्या प्रमुखाची ईडीकडून चौकशी झाली. पुढे 2017-18 मध्ये सोमैया यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. ही क्रोनोलॉजी समझिए, असे सांगत राऊत यांनी सर्व प्रकरणी तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सुरुवातीला 'किरीट का कमाल' असे ट्विट केले आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमैयांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधीचा निधी कसा मिळला. काळा पैसा पांढरा करायचा घाणेरडा डाव आहे, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. या सर्वांचा हिशोब द्यावाच लागेल. या प्रकरणी धर्मादाय आयुक्त, तपास यंत्रणाकडे तक्रार केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत आणि किरीट सोमैया असा वाद पुन्हा रंगणार आहे.