मुंबई - मराठी माणसाच्या हक्कासाठी मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली. मात्र, कालांतराने निवडणुकीच्या राजकारणात हा मुद्दा काहीसा बाजूला ठेवून निवडून येण्याला प्राधान्य दिले जात आहे. ठाकरे घराण्यात पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी वरळीतल्या गुजराती भाषिकांना केम छो वरली अशा मोठ्या होर्डिंग्जच्या माध्यमातून साद घातली जात आहे.
मुंबईमध्ये जवळ-जवळ 40 लाख हून अधिक गुजराती भाषिक असल्याचे सांगण्यात येते. वरळी मतदारसंघात तब्बल 25 हजार गुजराती भाषिक मतदार आहेत. या मतदारांना त्यांच्याच भाषेत आकर्षित करण्यासाठी शिवसेनेला आता मराठी ऐवजी गुजराती भाषेचा आधार घ्यावा लागतोय. या मतदारसंघात शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज सचिन अहिर यांचा पराभव केला होता. साहजिकच अहिर डोकेदुखी ठरू नयेत यासाठी शिवसेनेने अहिर यांनाच पक्षात ओढून घेतले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा झालाय.मात्र, शिवसेनेच्या युवराजांचा विजय कमी मताधिक्याने झाल्यास त्याचा दूरगामी परिणाम टाळण्यासाठी सेनेकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. आदित्य ठाकरे आज पासूनच प्रचाराच्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. नवरात्रोत्सवात तिथल्या मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी ही ते चर्चा करणार आहेत.