मुंबई - शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे मंत्री आणि आमदार फोडले आहेत. आमदार फोडल्यानंतर मुंबई महापालिकेतील २० ते २२ नगरसेवकही फुटणार अशी चर्चा आहे. या माजी नगरसेवकांना गळाला लावून मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेला सत्तेतून बाद करण्याची खेळी सुरु आहे. मात्र आम्ही आजही शिवसैनिक असून शिवसेनेसोबत असल्याचा दावा अशा नगरसेवकांकडून केले जात आहे.
नगरसेवक फुटणार असल्याची चर्चा - शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये मुंबईमधील प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे हे आमदार सहभागी झाले आहेत. या आमदारांच्या संपर्कातील २० ते २२ नगरसेवक फुटतील अशी चर्चा आहे. याबाबत आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी आम्ही शिवसैनिक आहोत. आजही शिवसेनेसोबत आहोत. असा वेगळा काही विचार केलेला नाही असे सांगितले. तर आमदार यामिनी जाधव यांचे पती शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेतील माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नसल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.
महाराष्ट्र कोणाच्या चरणी - मुंबई महापालिकेतील नगरसेवक फुटणार अशी चर्चा आहे. याबाबत मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, आताच जर आणि तर वर बोलणे योग्य होणार नाही. सर्वच गोष्टींना काळ हाच एक औषध असते. उद्धव ठाकरे यांनी जे काम केले आहे ते देशभरात, जगभरात सर्वानी पाहिले आहे. स्फटिकासारखे स्वच्छ विचार आणि हृदय असणारा मुख्यमंत्री आज मिळाले आहेत. भाजपा सोडून सर्व पक्ष आपण चांगला मुख्यमंत्री गमावतो आहे, हे बोलत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सद्वारे भीतीचे वातावरण निर्माण होऊन जे लोक गेले आहेत, याचा जनता विचार करत आहे. हे लोक महाराष्ट्र कोणाच्या चरणी विलीन करत आहेत हे दिसत आहे असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
शिवसेनेची महापालिका शाबीत राहील - त्यांनी केलेल्या गोष्टी आता प्रत्यक्षात दिसू लागल्या आहेत. त्यामुळे भाजपचा कॉन्फिडन्स वाढला आहे. आमचाही कॉन्फिडन्स कमी झालेला नाही. येणाऱ्या काळात शिवसेनेची महापालिका शाबीत राहील. ज्यांनी महापालिका धुतली असे जे म्हणतात होते. ते आज तिकडे गेले आहेत असे यशवंत जाधव यांचे नाव न घेता टोला लगावला. वॉशिंग मशीन तयार आहे. वाल्याचा वाल्मिकी करण्याची तयारी आहे. मात्र हे जनता विसरणार नाही असे पेडणेकर म्हणाल्या.
महापालिकेत होते शिवसेनेचे ९७ नगरसेवक - मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची गेले २५ वर्षाहून अधिककाळ सत्ता आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. महापौरपद भाजपाकडे जाऊ नये म्हणून शिवसेनेने मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडले. तसेच अपक्ष नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. यामुळे शिवसेनेचे ९७ नगरसेवक होते. ७ मार्च २०२२ रोजी पालिकेचा कार्यकाळ संपला असल्याने पालिकेवर आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. शिवसेनेचे ९७ पैकी २० ते २२ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गट, भाजपा या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
हेही वाचा - Aaditya Thackeray On Rebel MLA : बंड करायचे होते तर त्यांनी इथे करायला हवे होते - आदित्य ठाकरे
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोरांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाची नरहरी झिरवळांना नोटीस