मुंबई - महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ( Shivsena ) एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी ( Eknath Shinde's rebellion ) केल्याने सरकार अल्पमतात आले आहे. सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू आहेत. विधीमंडळ शिवसेना पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांना व्हीप बजावला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड करत, गट स्थापन करण्यासाठी विधीमंडळ उपाध्यक्षांना पत्र लिहीत थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.
शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचे गटनेतेपद काढून घेतले. यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत, शिवसेनेला आव्हान दिले आहे.
विधीमंडळ उपाध्यक्षांना पत्र - शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्य़क्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या असल्याने बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत असून ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आल्याचे दिसून येत आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना नवे पत्र देत, सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. शिंदे यांच्या नव्या भूमिकेमुळे शिवसेनेतील ठाकरे विरूद्ध शिंदे संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून एकनाथ शिंदे सहीसलामत वाचणार?