मुंबई - राज्य मंत्रिमंडळ विस्तार 13 जुलैला होण्याची शक्यता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) त्यांनी वर्तवली आहे. मुंबईत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही शक्यता वर्तवली आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार या सरकारकडून झालेला नाही. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असा इशारा ही दिला होता. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, विधिमंडळात आमचे संख्यबळ जास्त आहे. त्यानुसार धनुष्यबाण निशाणी ही आमच्याकडेच राहणार आहे.
दिल्लीत मंत्रिमंडळावर चर्चा - 7 आणि 8 जुलै असे दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत अमित शहा यांच्या सोबत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली असल्याची माहिती आहे. दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून पहिल्या टप्यात शिंदे गटाकडून 5 ते 6 मंत्री शपथ घेतली. तर 8 ते 10 मंत्री भाजपकडून शपथ घेण्याची शक्यता आहे.
भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे सरकार - शिवसेनेमधून 40 आमदारांचा वेगळा गट बाहेर पडल्यावर भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांना सरकार बनविण्यासाठी पाठिंबा दिला. भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुतम चाचणी घेण्यासाठी पाचारण केले. यासाठी राज्यपालांनी विधानसभेचे 3 व 4 जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलाविले होते. या अधिवेशनात शिंदे सरकारने बहुतम चाचणी पूर्ण केली.
शिंदे सरकारला आव्हान - दरम्यान शिंदे सरकारची स्थापना कायदेशीर नाही, असे सांगत शिवसेनेने या निर्णयालाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर 11 जुलै रोजी सुनावणी घेऊ असे स्पष्ट केले होते. त्यामुळे राज्य सरकारचा बहुमत चाचणी घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. बहुमत चाचणी घेतली असली तरी प्रकरण कोर्टात गेल्याने शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला काही मुहूर्त लागू शकला नव्हता.
शिंदे सरकारला बहुमत - 3 व 4 जुलै रोजी राज्यपालांनी बोलाविलेल्या विशेष अधिवेशनात 3 जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी बहुमताने निवडून आले. त्यानंतर 4 जुलै रोजी शिंदे सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आली. यामध्ये शिंदे सरकारने 164 विरुद्ध 99 अशा मतांनी बाजी मारत बहुमत सिद्ध केली. तेव्हापासून शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार याबाबतीत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. मात्र, 11 जुलैला सरकारचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान ठरणार असल्याने शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार केलेला नाही.
किती जणांची लागणार वर्णी - मंत्रिमंडळ विस्तारात किती जणांची आणि कोणाची वर्णी लागणार यावर आता अटकळ बांधली जाऊ लागली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 13 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या वाटेला 5 मंत्रीपदे जाऊ शकतात. तर या सरकारमध्ये मोठा गट असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे 8 मंत्रीपदे पहिल्या टप्प्यात जाऊ शकतात.