मुंबई - दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या प्रस्तावित जागेची व आराखड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे स्वतः करणार आहेत. उद्या मंगळवारी (२१ जाने.) ते दुपारी ३.३० वाजता या ठिकाणाची पाहाणी करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतरही नेते उपस्थीत राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट; 'त्या' मुलाची मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली दखल
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच अनेक महत्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले. यामध्ये इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकतीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडयाची पाहणी केली होती. त्यानंतर अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन येत्या दोन वर्षांत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा... 'पंकजाताईंनी शुभेच्छा दिल्या त्याचा मनापासून आनंद'
पत्रकार परिषद दरम्यान अजित पवार यांनी या जागेची पाहणी खासदार शरद पवार स्वतः करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार इंदू मिलच्या या जागेची व आराखड्याच्या कामाची पाहणी पवार करणार आहेत. त्यांच्यासमवेत अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.