मुंबई : धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपाप्रकरणी आज शरद पवारांनी मत व्यक्त केले. कोणीही आरोप करावा, आणि लगेच निर्णय घ्यावा अशी परिस्थिती या प्रकरणात नाही. त्यामुळे यामध्ये तपासाअंती न्यायालय जो निर्णय देईल तो अंतिम असेल असे पवार म्हणाले.
पोलिसांनी वास्तव पुढे आणावे..
याप्रकरणी मुंडेंवर आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात, तीन वेगवेगळ्या व्यक्तींना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेल्याचे समोर आले आहे. यात भाजपाच्या एका नेत्यानेही महिलेवर आरोप केला आहे, त्यासोबतच इतरांनीही तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे इतर तक्रारांचीही माहिती घ्यावी, आणि त्यानंतर पोलिसांनी वास्तव पुढे आणावे असे मत पवारांनी व्यक्त केले.
महिला अधिकारामार्फत व्हावी चौकशी..
या प्रकरणाची चौकशी एसीपी स्तरावरील महिला अधिकाऱ्यामार्फत केली जावी, असे पवारांनी यावेळी सुचवले. तक्रारदार महिलेवर ब्लॅकमेलिंगचे आरोप आहेत. त्यामुळे या प्रकरणाची अधिक खोलात जाऊन चौकशी होणे आवश्यक असल्याचेही पवार म्हणाले.
कोणावर अन्याय होता कामा नये..
या प्रकरणाकडे आम्ही फार गांभीर्याने पाहत आहोत. आरोप करणाऱ्याबाबत एकाहून अधिक गोष्टी बाहेर आल्या आहेत. त्यामुळे कोणीही आरोप करावा आणि त्यावर लगेच निर्णय घ्यावा अशी परिस्थिती येथे नाही. तपासाअंती वस्तुस्थिती लक्षात घेऊन मगच निर्णय घ्यावा, असे पवार म्हणाले.
सत्ता गेल्यामुळे अस्वस्थता..
भाजपाकडून होणाऱ्या आरोपांबाबत बोलताना पवार म्हणाले, की सत्ता गेल्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थाता आहे. त्यातूनच अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत.
तर अधिक काळजीपूर्वक तपास सुरू असल्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नसावा अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली. याबाबत आज चर्चा करण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा : तुर्तास दिलासा! धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत निर्णय