मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shivsena Rebel Leader Eknath Shinde ) यांनी शिवसेनेतील 40 आमदार फोडून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठीची कसरत सुरू झाली आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader Of Opposition Devendra Fadnavis ) यांनी काल 27 जुलै रोजी राज्यपालांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीनंतर महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता आहे. तर आहेच. या सोबत सरकार वाचवण्यासाठी धडपड देखील सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आज सकाळी आपल्या निवासस्थानी महाविकास आघाडी च्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीला शिवसेनेकडून कोणीही उपस्थित नसल्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. तथापि, राज्यपालांनी उद्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यासाठी शिवसेनेचे नेते कायदेशीर बाबींची पूर्तता करत असल्याने या बैठकीत उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती खात्रीला सूत्रांकडून मिळाली आहे.
शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते. तर काँग्रेस कडून मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री सुनील केदार, मंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही बैठक जवळपास एक तास चालली. या बैठकीत महाविकास आघाडी समोर असलेल्या कायदेशीर पर्यायांवर चर्चा झाली असून बहुमत चाचणी द्यावीच लागली तर त्याबाबत रणनीती आखण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर चर्चा - शिवसेनेचे बंडखोर 16 आमदारांना उपसभापती यांनी सदस्यत्व रद्द का करू नये याबाबत नोटीस पाठवली होती. मात्र या विरोधात बंडखोर आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायायलाने 11 जुलैपर्यंत परिस्थिती जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, राज्यापालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. राज्यपालांच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कायदेशीर बाबींवर त्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी नेत्यांची एक तास बैठक - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांची बैठक संपल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जवळपास एक तास बैठक घेतली. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही मुंबईत येण्याच्या सूचना या बैठकीतून देण्यात आल्या आहेत. आज सायंकाळपर्यंत सर्व आमदारांनी मुंबई उपस्थित राहण्याबाबत या सूचना बैठकीत देण्यात आली आहे.
हेही वाचा - Eknath Shinde on floor test : आम्हाला कोणत्याही फ्लोअर टेस्टची चिंता नाही-एकनाथ शिंदे