मुंबई - विद्वत्तेचा मक्ता पुणे-मुंबईच्या लोकांनी घेतला नाही. ग्रामीण भागातील लोकांचे यात मोठे योगदान राहिले आहे. परंतु, आपल्या समाजात ग्रामीण भागातील जाणकार व विद्वत्ता असलेल्या लोकांची नोंद घेतली जात नाही, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी संपादन केलेल्या 'मराठा समाजातील स्त्रिया' या पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की मराठा समाजातील अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आणि त्यांचे योगदान मोठे राहिले आहे. विशेषत: शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील महिलांचा यात मोठा वाटा आहे. त्या महिलांच्या योगदानाचीही नोंद पुस्तकातून व्हावी, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.
अनेक महिलांचे कार्य जवळून पाहिले-
पुढे पवार म्हणाले की, चोरमारे यांच्या 'मराठा समाजातील स्त्रिया' या पुस्तकात मराठा समाजातील महत्त्वाच्या २० कर्तृत्ववान महिलांची माहिती दिली आहे. यामधील काही महिला जवळून पाहिलेल्या आहेत. अनेकांचे कार्य पाहिलेले आहे. यातील हिराताई पाटील राज्य विधानमंडळमध्ये होत्या. सरोजिनी बाबर यांचे विधान परिषदेत मोठे योगदान राहिले होते. या पुस्तकातील डॉ. रखमाबाई यांनी वैद्यकीय क्षेत्रात योगदान देण्याचे धाडस दाखवले. ताराबाई शिंदे या शेतकरी कुटुंबातील होत्या. आपण समाजात परिवर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, म्हणून लिखाण केले होते. त्या वऱ्हाडमधील होत्या. वऱ्हाडमधील लोकांच्या मनाचा मोठेपणा होता. ताराबाई या परिसरात वाढल्या होत्या. त्यावेळी सत्यशोधक समाजाचा विचार रुजला होता. त्या भागात गेल्यास जुन्या आठवणी येतात, असेही पवार म्हणाले.
ग्रामीण भागातील स्त्रियांच्या योगदानावर या पुस्तकात अनेकांना समोर आणण्यात आले आहे. हे सांगताना पवार म्हणाले की, ग्रामीण भागातील जाणकार व विद्वत्ता असलेल्या लोकांची पुस्तकाच्या माध्यमातून नोंद घेण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी शिक्षण मंत्री अशिष शेलार व चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव आदी उपस्थित होते.
शरद पवारांनी नुकतेच आईला उद्देशून लिहिले होते पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी त्यांच्या आईला उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले आहे. चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, गहिवर आणते. तुमच्या प्रेरणेच्या बळावर नेहमी उभारी घेण्याचा निर्धार केला. कौटुंबिक जबाबदारी व सामाजिक बांधिलकी समान न्यायाने सांभाळत, सामान्यांसाठी अखंड काम करण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती.