मुंबई - सचिन वाझे प्रकरणात आता शरद पवार यांनी लक्ष घातले असून, आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक शरद पवार यांनी बोलावली आहे. प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काड्या सापडल्यानंतर हे प्रकरण आता राजकीय वळण घेताना देखील पाहायला मिळतेय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर यात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सत्ताधारी पक्ष सचिन वाझे यांना पाठीशी घालते का? असा प्रश्न भाजपने केला.
त्यानंतर आज शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. जवळपास पाऊण तास मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत सचिन वाझे प्रकरणात सरकारची नेमकी काय भूमिका आहे, हे शरद पवारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मालिन होत असल्याचं यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलून सचिन वाझे संबंधी चर्चा करणार आहेत.
बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले, की अंबानी स्फोटक प्रकरणी एटीएसने तपास केला आणि नंतर एनआयए तपास करत आहे. मात्र जो दोषी असेल त्यावर कारवाई होईल तसेच सत्य समोर येईल. कोणाचेही खातेबदल होणार नाही.
राजेश टोपे यांनी सांगितले, की शरद पवार जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असतो.
हे ही वाचा- सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याचा निर्णय कसा झाला? -
गृहमंत्र्यांवर देखील दबाव, गृहमंत्रीपद काढून घेण्याची शक्यता -
सचिन वाझे यांना एनआयए अटक केल्यानंतर अनेक पुरावे समोर आले आहेत. स्कॉर्पिओ गाडी सोबतच असलेली ईनोवा कार आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर या संबंधीचा दबाव गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चर्चा शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सोबत करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सचिन वाझेच्या प्रकरणात वाढत्या दबावामुळे अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपद जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले, की सर्व मंत्र्यांची मासिक बैठक असते. त्याप्रमाणे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार दर महिन्याला ही बैठक घेत असतात. या बैठकीतून मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. तसेच चालू राजकीय घडामोडींवर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.