मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर राज्यपाल नियुक्त त्या 12 जागांच्या संदर्भात चर्चा झाली आहे. यासाठी आज पवार व मुख्यमंत्री यांची आज वर्षा बंगल्यावर एक बैठक पार पडली. तब्बल एक तासाहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीमध्ये विधानपरिषदेच्या त्या 12 जागा सोबतच राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यातील कोरोनाची परिस्थिती तसेच मराठा आंदोलकांकडून सुरू असलेली आक्रमक भूमिका आणि त्या आडून विरोधकांचे डावपेच आदी विषयावर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत प्रमुख्याने राज्यपाल नियुक्त त्या 12 जागां संदर्भात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच 12 जागा संदर्भात ठराव मंजूर करून त्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपालांकडे दाखल करण्यासाठीचे अधिकार बहाल करण्यात आले होते. मात्र अद्यापही काँग्रेसच्या चार नावाबद्दल संभ्रमाचे वातावरण असून शिवसेनेमध्ये ही अनेक नावे हे नव्याने सामील होणार असल्याने त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवारांचे मत जाणून घेतले असल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच कालपासून शिवसेनेनेही मातोंडकर यांना ही संधी देण्यासाठी चर्चा सुरू केल्याने काँग्रेस मध्ये एक नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यावरही दोन्ही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यानंतर सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा आणि न्याय मिळावा यासाठी आणखी काही उपाययोजना पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुचवल्या आहेत, सोबतच राज्यातील कोरोना आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर मुख्यमंत्र्यांनी राज्याचा संपूर्ण आढावा सांगत त्यावरही चर्चा केली असल्याचे सांगण्यात येते.