नवी मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार आम्हाला रात्री भेटतात त्यामुळे भीतीपोटी अजित पवार ( Ajit Pawar ) सारखे-सारखे माध्यमांसमोर येऊन शिंदे-फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Govt ) पडणार असल्याचे सांगतायत. आमच्या 170 चे 175, 180 आमदार कधी झाले हे कळणार देखील नाही. पाण्याविना माशाप्रमाणे सत्तेविना अजित पवारांची अवस्था झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री, ठाणे तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई ( Guardian Minister of Satara Shambhu Raje Desai ) यांनी म्हटले आहे.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री पदी निवड झाल्याबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघातील ( Patan Assembly Constituency ) मुंबई स्थित रहिवाश्यांनी नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता. वाशी विष्णूदास भावे सभागृहात आयोजित या समारंभप्रसंगी देसाई बोलत होते. बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब देसाई यांचे घनिष्ठ संबंध होते. 1966 ला शिवसेनेच्या उभारणीमध्ये बाळासाहेब देसाईंचे मोठे योगदान आहे. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होते मग उद्धव ठाकरे स्वतः का मुख्यमंत्री झाले असा सवाल देखील शंभूराज यांनी यावेळी केला. ठाकरे सरकारमध्ये विधानसभेत जाऊन बसणे आणि प्रश्नांना उत्तरे देणे एवढेच आमचे काम होते.
राज्यमंत्र्यांना जेवढा निधी मिळत नव्हता तेवढा निधी राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला मिळत होता. हे आम्ही कित्येकवेळा उद्धव ठाकरेंच्या कानावर घातले मात्र तिन्ही पक्ष्याचे सरकार आपल्याला टिकवायचे आहे हेच उत्तर मिळाले. ठाकरे यांनी शिवसेना पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला होता. आम्ही जर बाहेर पडलो नसतो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला गिळून टाकले असते. ठाकरे सरकार हे उद्धव ठाकरे नाही तर अजित दादा चालवायचे. दररोज सकाळी आठ वाजता टीव्हीवर दिसणारे कुठे गेले असे म्हणत देसाई यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला. दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना हा आपला पक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेल्या शिवसेनेप्रमाणे काम करेल अशी ग्वाही यावेळी उपस्थितांना देसाई यांनी दिली.