मुंबई - भारतीय क्रिकेटची आज मोठी हानी झाली आहे. भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून ओळखल्या जाणारे ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासूदेव परांजपे यांचे आज (सोमवार) निधन झाले आहे. माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांचे ते वडील होते. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वासूदेव परांजपे यांनी मुंबई आणि बडोद्यासाठी 29 फर्स्ट क्लास मॅचेस खेळल्या. मात्र, त्यानंतर ते क्रिकेट प्रशिक्षणाकडे वळले होते.
'या' दिग्गज खेळाडूंना केले होते मार्गदर्शन -
वासूदेव परांजपे यांनी सुनील गावस्कर, राहुल द्रविडसह सचिन तेंडूलकर यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते. असे म्हणतात की, सुनील गावस्कर यांना 'सनी' हे टोपननाव वासूदेव परांजपे यांनीच दिले. त्यांच्या जाण्याने क्रिकेट जगतामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
हेही वाचा - Tokyo Paralympics : भारताची पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई; अवनी लेखराचा सुवर्णवेध...