मुंबई- शहरातील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या 11 व्या मजल्यावरून गुरुवारी सतीश खन्ना या 67 वर्षीय वृद्धाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मृत सतीश खन्ना हे मुंबईतील चेंबूर परिसरातील डायमंड गार्डन येथील खन्ना अपार्टमेंट येथे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून खन्ना हे हायपर टेंशनच्या आजारावर बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत होते.
गुरुवारी सायंकाळी 4 वाजता रुग्णालयातून उपचार पूर्ण करून डिस्चार्ज घेतल्यावर, सतीश खन्ना यांच्या मुलाने त्यांना रिसेप्शन काऊंटरवर थांबण्यास सांगितले. रुग्णालयाचे बिल भरताना अचानक सतीश खन्ना यांनी त्यांच्या मुलाची नजर चुकवून रुग्णालयाच्या 11 व्या मजल्यावर जाऊन उडी मारून आत्महत्या केली.
या प्रकरणी आजाद मैदान पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.