मुंबई - राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत -
रस्त्यांवरील नियम पाळताना किंवा रस्ते क्रॉस करतांना ज्या सोयी- सुविधा असतात त्यात सहजता हवी, त्याकडे लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचे नाव येणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, असे ठाकरे म्हणाले.
‘संयम’ आणि ‘नियम’ पाळले नाही तर यम येतो-
रस्ते सुरक्षा हा जीवनशैलीचा भाग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, नियम आणि संयम या दोन्ही शब्दात यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो. जो आपला जीव घेऊन जातो. रस्ते फक्त माणसेच क्रॉस करत नाहीत तर प्राणीही करतात. त्यांचीही काळजी घ्यायला हवी. नवीन तंत्रज्ञान, अधिक वेगाच्या गाड्या येत आहेत. त्या दृष्टीने माहिती देणे आणि जनजागृती करणे महत्वाचे आहे. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना नियम आणि शिस्त याची माहिती हवी. तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील.
वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांचे शिक्षण द्यावे. कार्यक्रमात प्रकाशित दिनदर्शिकेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा चित्र आणि स्लोगन तयार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना धन्यवाद देऊन मुख्यमंत्र्यांनी ते करत असलेल्या जनजागृतीच्या कामाचा गौरव केला.
अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न - अनिल परब
परिवहन मंत्री ॲड. अनिल परब म्हणाले, ‘सडक सुरक्षा- जीवन रक्षा’ हे यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य असून हे अभियान यावेळी पहिल्यांदाच 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2012 पर्यत महिनाभरासाठी सुरू राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीवर आपण अथक प्रयत्नातून, नियमांचे पालन करत आणि परस्परांच्या सहकार्याने नियंत्रण मिळवू शकलो. तसेच प्रयत्न अपघात कमी करण्यासाठी देखील केले पाहिजेत. यावर्षी जवळपास 24 हजाराच्या आसपास अपघात झाले असून आधीच्यावर्षीच्या तुलनेत त्यात 23 टक्के कमी आली आहेत. तर मृत्यूमध्ये 10 टक्के कमी आली आहे. असे असले तरी अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी नाही. ते आणखी कमी करण्यासाठी विविध उपक्रमातून वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती करुन या वर्षभरात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही ॲड.परब यांनी केले.
नियमांचे काटेकोरपणे पालन करावे - शेख
पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. वाहन चालन परवाने कामात विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही शेख यांनी केले.
पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी रस्ता सुरक्षेचे महत्व आणि गरज अधोरेखित केली. प्रास्ताविक मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी केले तर आभार परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मानले.
हेही वाचा- धनंजय मुंडेंबाबत सत्यता पडताळून निर्णय घेतला जाईल- उपमुख्यमंत्री
हेही वाचा- तृतीयपंथी अंजलीची 'रिक्षा' सुसाट; ग्रामपंचायतवर झेंडा फडकवणारी पहिली तृतीयपंथी