मुंबई - शहरातील शाळा र्व्हच्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम आणि एसी वर्ग यांसारख्या सोयीसुविधांनी सज्ज असल्याचे दिसते. तसेच शिक्षणासाठी मुंबई चांगले असल्याचे मानले जाते. मात्र, याच मुंबईत अनेक नाक्यांवर रस्त्यांवर लहान मुले शाळा सोडून काम करताना दिसतात. अशा मुलांसाठी मुंबईतील कांदिवली परिसरात एक शाळा चक्क स्कायवॉक वरच भरताना पाहायला मिळते.
झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी कांदिवली परिसरातील एका स्कायवॉकवर 22 वर्षीय तरुणी हेमंती सेन आपल्या मित्रांना सोबत घेऊन जुणून संस्थेअंतर्गत परिसरातील गरीब मुलांसाठी शाळा भरवते. ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता हे वर्ग भरत असून रस्त्यावरील मुलांनी शिकावं यासाठी तीची धडपड सुरू आहे.
फुटपाथवर राहणारी, भीक मागणारी मुलं भीक मागून किंवा चोऱ्या करून पैसे कमवतात आणि नको त्या व्यसनांच्या आहारी जातात. भीक मागणाऱ्या मुलांबद्दल हा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन असतो. पण मुंबईतल्या हेमंती सेनने मात्र या मुलांच्यात जे पाहिलं ते कुणालाच दिसलं नाही. त्यामुळेच या तरुणीने मुलांना शिकवायचं हे ध्येय उराशी बाळगलं आहे. २०१८ पासून मुलांना शिक्षणाचे धडे हेमंती देत आहे. स्कायवॉकवरच या मुलांची शाळा भरते. सध्या १५ मुलं या शाळेत शिक्षण घेतात. हिंदी, मराठी बाराखडी, नृत्यकला, चित्रकला इतर विविध अशा अनेक गोष्टींचं ज्ञान मुलांना इथून मिळत आहे. हेमंती आणि तिच्या जुणून टीमनं पाहिलेलं स्वप्न एका वर्षानंतर पूर्ण झालं आहे. काही ठिकाणी मुलं शाळेत जातायेत तर काही नियमितपणे स्कायवॉकवर शिकायला येत आहेत.
असा सुरू झाला मुलांना शिकवण्याचा प्रवास -
हेमंती सेन सांगतात, कामावर जाताना या मुलांना मी भीक मागताना पहायची. मला त्यांच्या भविष्याची काळजी वाटायची. ही मुलं कशी जगतात? शाळेत तरी जातात का? शिक्षण काय आहे? हे तरी त्यांना माहित असेल का? असे अनेक प्रश्न मला पडायचे. एके दिवशी त्यांनी त्यांना भेटण्याचा निश्चय केला आणि त्यांनी त्यांची भेट घेतली. मुलं बोलायला तयार नव्हती पण कसंबसं त्यांनी आईवडिलांकडे पोहचण्यासाठी प्रयत्न केला व त्यांच्याशी बोलले असता कुटुंबाचा मानस त्यांना शिकवण्याचा दिसत नव्हता.
सेन यांनी आग्रह केल्यानंतर रोज दुपारी त्या आपलं काम करून तिकडे मुलांना स्कायवॉकवर शिकवू लागल्या. ऑक्टोबर २०१८ पर्यंत हेमंती मुलांना एक दिवसआड शिकवायला यायच्या. पण आता नोव्हेंबरपासून रोज त्या मुलांना शिकवू लागल्या. या मुलांसाठी त्यांनी स्पेशल टाईमटेबल आखला आहे. यात शनिवार आणि रविवार हे दोन दिवस नृत्यकला, क्राफ्ट आणि आर्ट आदींचे क्लास होतात. तर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार, असे तीन दिवस बाराखडी, कविता आणि बाकी अभ्यास घेतला जातो. बुधवारी नुक्कड नाटक आयोजित केलं जातं.
मुलांना येथेच कुठपर्यंत शिकवणार, हा प्रश्न त्यांना पडला. यानंतर त्या, मुलांच्या प्रवेशासाठी शाळेतजाऊ लागल्या. परंतु प्रवेश मिळेना कारण कागदपत्रे नव्हती. तसेच ही मुले रोज शाळेत येतील का हाही प्रश्न होताच. ते रोज शाळेत येतील यासाठी विनवणी केल्यानंतर अखेर काहींना प्रवेश मिळाला आहे. पण ज्या काही मुलांना शाळेत प्रवेश मिळालला नाही आणि इतर विविध परिसरात शाळेत न जाणाऱ्या मुलांना हेमंती सेन व जुणून टीम ठरवलेल्या वेळापत्रकानुसार आजही स्कायवॉकवर शिकवतात.जुणून टीमला मुंबईतून अनेक लोक मदत करत आहेत. त्यांनी प्रत्येक मुलाला शिकवण्याच पाहिलेलं स्वप्नं हळूहळू पूर्ण होत आहे.
त्यामुळे अमाप प्रगती करत असलेल्या देशात काही तरुण तरुणी पिज्जा आणि बर्गर खाण्यात व्यस्त आहेत. तर काही तरुणाई रस्त्यांवरील या मुलांसाठी मोठे कष्ट घेत आगेय त्यामुळे तुम्हालाही या मुलांना शिकवन्यासाठी काही मदत करावयाची असेल तर haimanti@junoon.org.in या आयडीवर संपर्क साधू शकता.